मिरची तोडण्याकरिता मजुरांचे तेलंगणात स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:31 AM2021-02-09T04:31:11+5:302021-02-09T04:31:11+5:30
मूल : ग्रामीण भागातील निवडणुकीची धामधूम संपताच, गावखेड्यातील मतदारांना पोटाची चिंता भेडसावत आहे. पोटाची खळगी भरण्याकरिता मूल ...
मूल : ग्रामीण भागातील निवडणुकीची धामधूम संपताच, गावखेड्यातील मतदारांना पोटाची चिंता भेडसावत आहे. पोटाची खळगी भरण्याकरिता मूल तालुक्यातील भेजगाव व परिसरातील मजुरांचे लोंढे मिरची तोडाईकरिता तेलंगणातील खमम जिल्ह्यात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न आजही ग्रामीण भागात सतावत असल्याचे दिसून येते आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मजूर परराज्यात अडकल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले. ऐन गावाकडे परतण्याच्या वेळेवरच कोरोनाने कहर केल्याने प्रशासनाला लाॅकडाऊन करावा लागला. परिणामी, मिळेल त्या साधनाने तर काहींनी पायी प्रवास करीत गाव गाठले. गावात आल्यावरही कुटुंबापासून दूर राहावे लागले. या वर्षीही मजूर वर्ग रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर होत आहे. या वर्षी प्रवासाची साधने पूर्णतः सुरू झाली नसल्याने मजुरांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. तेलंगणातील शेतमालकच मजुरांना नेण्यासाठी मालवाहू गाड्या पाठवित आहेत, तर काहींनी रेल्वेचे ऑनलाइन आरक्षण करून मजुरांचे स्थलांतर सुरू केले आहेत. यामुळे गावेच्या गावे ओस पडत असल्याचे दिसून येत आहे.