धान पिकावर लष्करी अळीचे आक्रमण
By Admin | Published: August 30, 2014 01:20 AM2014-08-30T01:20:01+5:302014-08-30T01:20:01+5:30
यावर्षी पोंभुर्णा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला असून तालुक्यात ४० ते ५० टक्के धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेकांचे धान पीक करपायला लागले आहेत.
देवाडा (खुर्द) : यावर्षी पोंभुर्णा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला असून तालुक्यात ४० ते ५० टक्के धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेकांचे धान पीक करपायला लागले आहेत. उर्वरित पीक काही प्रमाणात तग धरुन असतानाच वाढत्या उन्हामुळे लष्करी अळीने धान पिकावर आक्रमण केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे.
मागील वर्षी झालेल्या संततधार पावसाने संपूर्ण परिसरामध्ये कहर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्या संकटातून स्वत:ला सावरत परिसरातील शेतकऱ्यांनी हतबल न होता यावर्षी पुन्हा जोमाने मशागतीला सुरुवात केली. मात्र यावर्षी पुन्हा निसर्ग कोपला. तालुका परिसरामध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात महागडी बिजाई, खत घेऊन रोवणी केली. बँकेचे कर्ज घेऊन पैशाची व्यवस्था केली. रोवणी झाल्यापासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
परंतु अजुनपर्यंत वरूणराजाला शेतकऱ्यांची केविलवाणी अवस्था दिसली नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील संंपूर्ण पिके करपायला लागली आहेत. त्यातच काही पीक तग धरुन असताना त्यावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने उरले-सुरले पिकही हातून जाण्याची वेळ आल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. लष्करी अळीने एवढे उग्ररुप धारण केले आहे की, धान पिकासह शेतात असणाऱ्या (गवत) तणावरही या अळ्या ताव मारत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा मिळणेही दुरापास्त झाले आहे. परिसरात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
याबाबत कृषी कार्यालयात संपर्क साधला असता, सध्या औषधी उपलब्ध नसल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले. वरिष्ठस्तरावर औषधीची मागणी करण्यात आली असून औषधी उपलब्ध होताच, ती पुरविण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी स्पष्ट केले.
सध्या तालुक्यातील धान पिकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. लष्करी अळीचा प्रकोप रोखण्यासाठी शेतकरी खासगी कृषी केंद्रातून औषधे घेऊन फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कृषी विभागाने तात्काळ पोंभुर्णा कार्यालयात औषधी साठा उपलब्घ करुन स्थानिक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर औषधांचा पुरवठा करावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन चलाख यांनी केली आहे. (वार्ताहर)