सैनिकी शाळेचे अपूर्ण काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:26+5:30
सैनिकी शाळा हा आ. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. सैनिक शाळेसह मतदार संघातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण व्हावी, यासाठी प्रकल्पांना भेटी देत पाहणी करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी सैनिकी शाळेला भेट दिली. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी या शाळेत पुतळेदेखील उभे राहत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावरील सैनिकी शाळेला शुक्रवारी भेट देत पाहणी केली. या सैनिकी शाळेतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या व त्या दृष्टीने युध्द पातळीवर काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात भारत सरकारचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लवकरच आपण भेट घेणार असून सैन्य दलाच्या माध्यमातून लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या भेटीदरम्यान दिले.
सैनिकी शाळा हा आ. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. सैनिक शाळेसह मतदार संघातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण व्हावी, यासाठी प्रकल्पांना भेटी देत पाहणी करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी सैनिकी शाळेला भेट दिली.
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी या शाळेत पुतळेदेखील उभे राहत आहेत. सभागृहामध्ये कारगिल युद्ध, भारताचे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकाचे थ्री डायमेन्शन माहितीपट दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ वस्तू याठिकाणी दर्शनी ठेवण्यात आल्या आहेत. सैनिकी शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत ही चंद्रपूरच्या किल्ल्याप्रमाणे आहे. मैदान हे आॅलिम्पिक दर्जाचे आहे. एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टँक पासून तर सर्व सुविधा या भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे आहेत.
सदर सैनिकी शाळेत मुलींना वर्ग सहावीकरिता प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा हा निर्णय देशातील फक्त दोन शाळांकरिताच घेण्यात आला असून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिक शाळेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वर्ष २०२० करिता मुलींना सैनिकी शिक्षण मिळण्याविण्याची दारे खुली झाली आहे. पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूर येथील सैनिकी शाळेपासून ही सुरूवात होत आहे. सैनिक शाळेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुत्यालवार, सैनिकी शाळेच्या उपप्राचार्या कॅप्टन अनमोल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
१२३ एकरात शाळेची वास्तू
सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयापैकी प्रमुख निर्णय म्हणजे चंद्रपूरची सैनिकी शाळा. भारतात आजमितीला असणाºया २६ सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये पूर्ण झाली आहे. पहिली ६ व्या वगार्ची तुकडी जून २०१९ पासून दाखल झाली आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल, अशा शुभेच्छा लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या माध्यमातूनच आ. मुनगंटीवार यांना सैनिकी शाळेच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली आहे. चंद्रपूर व बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंड जवळील १२३ एकरांमधील सैनिकी शाळेची वास्तू पूर्णत्वास आली आहे. या सैनिकी शाळेमध्ये भारतातील अद्ययावत असे सैनिकी संग्रहालय देखील आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महू या ठिकाणी असलेल्या सैनिकी संग्रहालयापेक्षा अधिक उत्तम हे संग्रहालय आहे. ताडोबाच्या पर्यटकांना सैनिकी शाळेच्या दर्शनी भागांमध्ये भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निरीक्षण कक्षातून या संपूर्ण शाळेचे कॅम्पस बघता येते.