बंद कोळसा खाणीतून कोट्यवधींच्या कोळशाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:27 PM2018-01-29T23:27:18+5:302018-01-29T23:28:33+5:30
तालुक्यातील बरांज मोकासा या भागातील कर्नाटका एम्टा ही खुली कोळसा खाण गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुरू असताना साठवून ठेवलेला जवळपास दीड लाख टन कोळसा चोरी जात असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे.
विनायक येसेकर।
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : तालुक्यातील बरांज मोकासा या भागातील कर्नाटका एम्टा ही खुली कोळसा खाण गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुरू असताना साठवून ठेवलेला जवळपास दीड लाख टन कोळसा चोरी जात असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे. ‘लोकमत’ने या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अनेक ठिकाणी वाहनांच्या चाकांच्या खुणा आढळून आल्या. आजपर्यंत या खाणीतून कोट्यवधी रुपयांचा कोळसा चोरीस गेला आहे. या प्रकारामुळे एम्टाचे सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाºयांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाने देशातील अनेक कोळसा खाणी बंद केल्या. त्यात तालुक्यातील बरांज मोकासा येथील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीचासुद्धा समावेश आहे. ही कोळसा खाण मार्च २०१५ ला बंद करण्यात आली. खाण सुरू असताना काढलेला कोळसा एका ठिकाणी साठवून ठेवण्यात आला. परंतु बंदीमुळे तो त्या ठिकाणी तसाच राहिला. या ठिकाणी एम्टा कंपनीच्या सुरक्षा अधिकाºयांसह ५० च्या वर सुरक्षा कर्मचारी नियुक्त करून ठेवले आहे. बंदच्या काळात त्याठिकाणी कंपनीने काढून ठेवलेला दीड लाख टन कोळसा आता हळूहळू चोरी जात आहे. या कोळशाची किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. या खाणीतून रात्री जेसीबीच्या साहाय्याने ट्रकांमध्ये कोळसा भरून वणी व इतर ठिकाणी विकला जात आहे. हे काम गेल्या वर्षभरापासून सर्रास सुरू आहे. याव्यतिरिक्त दररोज पहाटेच्या वेळेस २० ते २५ दुचाकी मोटारसायकलस्वार एकाच वेळी एका गाडीवर ४-४ पोती कोळसा भरून त्याची वाहतूक करीत आहे.
कोळसा वाहतुकीच्या वाहनाने अपघातही घडले
आठवडाभरापूर्वी दुचाकीने कोळसा वाहतूक करताना एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकी वाहनधारक गंभीर जखमी झाल्याची घटना मानोरा फाट्याजवळ घडली होती. यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. करिता या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. खाण चालू असताना स्टॉक रजिस्टरमध्ये नमुद केलेला कोळसा त्याठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. आता कोळशाच्या भागाला आग लावून तो जळून राख झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे.