चंद्रपुरात दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
By admin | Published: May 25, 2016 01:28 AM2016-05-25T01:28:09+5:302016-05-25T01:28:09+5:30
जिल्ह्यासह चंद्रपूर शहरातील अनेक वॉर्डात पाण्यासाठी हाहाकार सुरू असताना लिकेजद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय चंद्रपूर शहरात सुरू आहे.
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी अनेक वॉर्डात टाहो
चंद्रपूर : जिल्ह्यासह चंद्रपूर शहरातील अनेक वॉर्डात पाण्यासाठी हाहाकार सुरू असताना लिकेजद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय चंद्रपूर शहरात सुरू आहे. याकडे मनपा प्रशासन व पाणी पुरवठा कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केला आहे.
एकीकळे महानगरपालिका तसेच अनेक समाजसेवी संस्थाच्या माध्यमातून शहरवासीयांना पाणी बचतीचे धडे दिले जात आहेत. तर दुसरीकळे महानगरपालिकेद्वारे टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अनेक ठिकाणी लिकेज असल्याने त्याद्वारे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र अनेक वॉर्डात दिसून येते.
चंद्रपूर शहरामध्ये इरई धरणाद्वारे दररोज ४२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकाअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु, ही पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज आहे.
त्यामुळे दररोज २५.४ एमएलडी पाणी वाया जात असल्याचे राजेश बेले यांनी म्हटले आहे. त्यामुळे जेवढा पाणी पुरवठा शहरात केला जातो, त्यापैकी ५० टक्के पाणी वाया जात असल्याचे चित्र शहरात दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
अनेक ठिकाणी लिकेज
चंद्रपुरात रामनगर पोलीस ठाण्यापासून गेलेल्या पाईपलाईनमध्ये ११ ठिकाणी, रेल्वे पूलाजवळ ४ ठिकाणी, पाणी पुरवठा कार्यालय ते जिल्हा परिषद पाणी पुरवठा अधिकारी निवासापर्यंत २ लिकेज, तुकूम परिसरातील वाहतूक कार्यालयाजवळील व्हाल्वमध्ये खूप मोठा लिकेज, बाबुपेठ परिसरात सात ठिकाणी, पठाणपुरामध्ये चार ठिकाणी, वरोरा नाका दोन ठिकाणी, जटपुरा परिसरात चार लिकेज आहेत.
े नळाच्या पाण्याचा
अपव्यय
चंद्रपुरातील काही वॉर्डात पहाटे ४ वाजताच्या सुमारास नळ सोडले जातात. नागरिक या वेळेत साखर झोपेत असतात. त्यामुळे बहुतेक नागरिक यावेळेस पाणी भरत नाही. तर ते सकाळी ६ वाजतापासून नळाचे पाणी भरतात. परंतु, अनेकांचे नळ हे पहाटेपासूनच सुरू असतात. त्यामुळे दररोज किमान दोन तास पाणी वाया जात असते.