ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी आता मिनीबस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:24 PM2018-01-20T12:24:01+5:302018-01-20T12:24:22+5:30
पर्यटक प्रेमींसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ दर्शनाची सहज संधी मिळावी, यासाठी १८ आसनांच्या मिनीबसची फेरी १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पर्यटक प्रेमींसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ दर्शनाची सहज संधी मिळावी, यासाठी १८ आसनांच्या मिनीबसची फेरी १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. स्थानिक नागरिकांना व ऐनवेळी कार्यक्रम ठरवणाऱ्या पर्यटकांना यामुळे सुविधा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या बसफेरीसाठी किमान १५ दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील मूल रोडवरील कार्यालयात क्रेडीट किंवा डेबिट कार्डद्वारेच आरक्षण करण्यात यावे, अशी सूचना ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानने केली आहे.
पर्यटकांच्या आग्रहास्तव मिनीबस सुरू करण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला आहे. ही बसफेरी केवळ सकाळच्या भ्रमंतीसाठी असणार आहे. १ फेब्रुवारीपासून ही बस सकाळी ६ वाजता चंद्रपूर येथून निघून मोहर्ली गेटमार्गे निसर्ग पर्यटनासाठी जाईल. बसमध्ये १२ आसनांचे आरक्षण झाल्यानंतरच बसफेरी ताडोबा भ्रमंतीसाठी सोडली जाणार आहे. ताडोबा व्यवस्थापनाच्या या सुविधेमुळे पर्यटक व वन्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे.