जिल्ह्यात मंडळस्तरावर मिनी वेधशाळा
By admin | Published: June 9, 2017 12:55 AM2017-06-09T00:55:59+5:302017-06-09T00:55:59+5:30
हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर
हवामानाची अचूक आकडेवारी मिळणार : थेट पुणे येथून नियंत्रित होणार
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर (आर.आय.) स्वयंचलित वेधशाळा उभारण्यात येत आहेत. उपग्रहाद्वारे या वेधशाळेतील माहिती महावेध पुणे या शासनाच्या अधिकृत हवामान केंद्रात संकलित होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुका स्तराअंतर्गत येणाऱ्या मंडळस्तरावर त्यांची उभारणी करण्यात येत आहे.
चिमूर तालुक्यात खडसंगी, भिसी, नेरी, शंकरपूर, मासळ, जांभुळघाट, चिमूर याठिकाणी अशा वेधशाळा उभारण्यात येत आहेत. हवामान आधारित फळ पीक तसेच इतर पीक नियोजन करण्याचे धोरण शासनाचे आहे.
त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान टाळणे, तसेच नुकसान झाल्यास त्या भागातील हवामान त्या काळात कसे होते, त्याची माहिती घेणे यासह शेतकऱ्यांना हवामानाची पुर्वसुचना देणे, या उद्देशाने मंडळ स्तरावर वेधशाळा उभारण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कृषी विभाग त्यासाठी आग्रही असून मंडळस्तरांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे.
मिनी वेधशाळा स्वरूपात असलेल्या या वेधशाळेमध्ये हवेचा वेग, दिशा, वातावरणातील आर्दता, पावसाचे प्रमाण, तापमान यासह इतर बाबींची माहिती संकलित केली जाणार आहे. ही सर्व उपकरणे संगणकाद्वारे उपग्रहाशी जोडली जातील. आॅनलाईन डाटा हा ‘महावेध’ या शासनाच्या अधिकृत केंद्रात संकलित होणार आहे. त्याची माहिती व प्रत जिल्हाधिकाऱ्यांनादेखील मिळणार आहे.
सर्वच उपकरणे स्वयंचलित
ज्याठिकाणी ही उपकरणे बसवली जातील तेथे मनुष्यबळाची कुठलीही गरज राहणार नाही. सर्व उपकरणे ही संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे येथील महावेधच्या कार्यालयातून ती माहिती संकलित केली जाणार आहे. फक्त ज्या भागात हे उपकरणे बसविले जातील, तिथे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीवर राहणार आहे.
विजेची आवश्यकता नाही
हवामानाच्या माहितीसाठी उभारण्यात येणाऱ्या या उपकरणांना विजेची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारण उपकरणांना जोडलेल्या सौर बॅटरीद्वारे तेथे उर्जा निर्माण केली जाणार आहे. त्याद्वारेच उपकरणातील डाटा पाठविला जाणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातदेखील या उपकरणाकरिता विजेविना काही समस्या उद्भवणार नाही.
पीक व्यवस्थापनासाठी होणार मदत
यापुढे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन आता कुठलेही अनुदान देणार नाही. केवळ पीक विम्याद्वारे ती नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून भरपाई योग्य आणि पुरेशी मिळावी, याकरिता या वेधशाळा उपकरणाकडून मिळणाऱ्या अहवालाचाही उपयोग होणार आहे.
हवामानाचा अंदाज घेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उपकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. हवामानाची पूर्वसूचना देणे, कुठल्या भागात किती पाऊस पडला, हवेचा वेग आणि आर्दता किती राहिली, याची अचुक माहिती याद्वारे मिळणार आहे. कृषी विभागासाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे.
- एम. पी. पवार, तालुका कृषी अधिकारी, चिमूर