सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:53+5:302021-07-15T04:20:53+5:30
सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतन वाढ व किमान वेतन परिपत्रकात दुरुस्ती करून किमान नवीन वेतन श्रेणी लागू करण्यासाठी कामगार ...
सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतन वाढ व किमान वेतन परिपत्रकात दुरुस्ती करून किमान नवीन वेतन श्रेणी लागू करण्यासाठी कामगार मंत्री मुश्रीफ यांच्या मुुंबई येथील दालनात बैठक पार पडली. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त कल्याणकर उपस्थित होते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राटेक, माणिकगड, एसीसी, अंबुजा व दालमिया हे पाच सिमेंट उद्योग आहेत. यामध्ये किमान १५ ते २० हजार कामगार काम करतात. सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना समान किमान वेतन लागू करण्याचे परिपत्रक लागू करण्यात आले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन सिमेंट उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना अल्प वेतन मिळत असल्याची बाब कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार, विजय ठाकरे, किशोर भोयर, नारोटतं बाराई, सुधाकर तेजाने, गौतम भासरकर, सुनील धावस, दशरथ राऊत आदींनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना परिपत्रकाच्या आधारे अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगारांना लागू करण्यात आलेल्या समान किमान वेतन परिपत्रकात बदल करून सिमेंट उद्योगतील कामगारांना नवीन वेतन श्रेणी लागू करणे, २१ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली.