हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झालेल्या तरुणासाठी सुधीर मुनगंटीवार ठरले देवदूत
By राजेश भोजेकर | Published: December 12, 2023 03:44 PM2023-12-12T15:44:47+5:302023-12-12T15:46:04+5:30
कुटुंबियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मानले मुनगंटीवार यांचे आभार
चंद्रपूर: अंबोरे कुटुंबाचा भंगार विक्रीचा व्यवसाय. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. अशात २२ वर्षीय मुलगा तरुण आजारी पडला. त्याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. हातात पैसा नाही आणि कुटुंबाचं भविष्य असलेला तरुणही आजारी. अशा परिस्थितीत विवंचनेत सापडलेल्या पालकांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली. संकटात सापडलेल्या आईवडिलांची अवस्था मुनगंटीवार यांना बघवली नाही. त्यांनी तातडीने सूत्रे हलविली आणि तरुणवर मुंबईतील पंचतारांकित इस्पितळात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तरुणसाठी देवदूत ठरलेल्या मुनगंटीवार यांचे आभार मानताना अंबोरे कुटुंबियांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या.
गोंडपिपरी येथे राहणारा तरूण साहेबराव अंबोरे (वय २२) हा मूळचा नांदेड जिल्ह्याचा रहिवासी. गेल्या १६ वर्षांपासून अंबोरे कुटुंब गोंडपिपरी येथे वास्तव्यास आहे. तरूणच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासूनच बेताची आहे. त्यामुळे ते भंगाराचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतात. तरूणला लहानपणापासून हृदयाचा त्रास आहे. २००६ मध्ये त्याचावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. परंतु पुढील औषधोपचाराचा खर्च तरूणच्या आईवडिलांना पेलवत नव्हता. अशात तरुणची प्रकृती खालावत गेली व त्याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. २०१८ पासून त्याच्या त्रास खूप जास्त वाढला. आपल्या पोटच्या गोळ्याला तडफडताना बघून तरुणच्या आईवडिलांना काय करावे ते सूचत नव्हते. अशात त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांच्याशी संपर्क साधला. तरुणला वाचविण्यासाठी एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार, याची पूर्ण जाणीव बोडलावार यांना होती. त्यांनी तरूणच्या आईवडिलांना तातडीने मुनगंटीवार यांच्याकडे नेले.
आपली कैफियत सांगत असताना तरूणच्या आईवडिलांचा कंठ दाटून आला. ना. मुनगंटीवार यांनी तरुणच्या पालकांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवला. तरुणच्या आईवडिलांचे थरथरणारे हात हातात घेऊन आपण पूर्ण शक्तीने मदत करेन असा शब्द मुनगंटीवार यांनी दिला. आणि केवळ शब्द देऊन थांबतील ते सुधीर मुनगंटीवार कसे. त्यांनी तात्काळ आरोग्य सहाय्यक सागर खडसे यांना यासंदर्भात मदत करण्याच्या सूचना दिल्या.
जीवन-मरणाशी संघर्ष
स्वत: जातीने लक्ष घालत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तरुणच्या उपचारासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली व त्याला मुंबईला रवाना केले. अलीकडेच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. सुरेश जोशी यांनी तरुणच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यासाठी जवळपास 19 लक्ष रुपयांचा खर्च आला. शस्त्रक्रियेनंतर तरुणची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जीवन मरणाशी संघर्ष करीत असलेल्या आपल्या लेकराला स्वस्थ पाहून त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पाणावलेल्या डोळ्यांनीच त्यांनी देवदुतासारखे धावून आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.