महिलांच्या आरोग्यासाठी झटणार मिनी मंत्रालय

By Admin | Published: October 4, 2015 01:43 AM2015-10-04T01:43:43+5:302015-10-04T01:43:43+5:30

चंद्रपूर : घरातील महिला सुरक्षित असेल, तिचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब सुखी व सुरक्षित राहू शकेल. महिलांचे आरोग्य चांगले राहावे,...

Ministry of Minority Affairs for Women's Health | महिलांच्या आरोग्यासाठी झटणार मिनी मंत्रालय

महिलांच्या आरोग्यासाठी झटणार मिनी मंत्रालय

googlenewsNext

चंद्रपूर : घरातील महिला सुरक्षित असेल, तिचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब सुखी व सुरक्षित राहू शकेल. महिलांचे आरोग्य चांगले राहावे, ग्रामीण भागातील तळागाळात राहणाऱ्या महिलांना सर्व सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी मिनी मंत्रालय गंभीर झाले आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील गावागावात विविध उपक्रम राबविले जाणार आहे. या उपक्रमाला महिला अस्मिता पर्व असे नावही मिनी मंत्रालयाने दिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व साधारणपणे ग्रामीण जनतेने महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रभावी कृती करणे अपेक्षित आहे. त्यांची अस्मिता जपणे हे आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या हक्कांच्या स्वच्छता सुविधा निर्माण करून देणे महत्त्वाचे आहे. यास्तव अथक परिश्रमांची व अव्याहत चालणारी मोहिमच आवश्यक आहे. या मोहिमेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माता भगिनी या महत्त्वाचा घटक आहेत. त्यांची सुरक्षितता व आरोग्य सर्वांसाठी महत्त्वाची बाब आहे. आणि ही बाब लोकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनजागृतीतून पटवून देण्यात येणार आहे.
केंद्र शासनातर्फे गाव हागणदारी मुक्त करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविली जात आहे. गावागावात रस्त्यांवर शौचास कुणीही बसू नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे. महिलांची होणारी कुचंबना दूर व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. मात्र या मोहिमेचा पाहिजे तसा परिणाम अजूनही ग्रामीण भागात दिसून येत नाही. यामुळे महिलांना होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही पोटाचे विकार प्रत्येक ग्रामीण स्त्रीला होत आहेत. घरातील प्रत्येकाने आपल्या घरच्या स्त्रीचा विचार करून घरात एक वस्तु कमी खरेदी करावी. पण घरा-घरात शौचालय बांधकाम झालेच पाहिजे. याकरिता जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. हे महिला अस्मिता पर्व २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबविले जाणार आहे. या कालावधीत विविध उपक्रम राबवून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१५-१६ मधील २३२ ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती केली जाणार आहे. गावातील ग्रामस्थांचा सक्रीय लोकसहभाग मिळविणे, हाही प्रमुख उद्देश असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून आखणी करण्यात आली आहे.
या कालावधीत जनजागृतीपर विविध उपक्रमांसोबतच विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. या महिला अस्मिता पर्वासाठी खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ज्ञ यांनी चांगलीच कंबर कसली आहे. (शहर प्रतिनिधी)
गावागावांत असे राबविणार उपक्रम
ग्रामपंचायतीकरिता संपर्क अधिकारी नेमणूक करणे, १९ नोव्हेंबर रोजी जाहीर करावयाची ओडीएफ गावांची निवड, पंचायत समिती स्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक संपर्क अधिकार यांची कार्यशाळा, हागणदारी मुक्त निर्मूलन कृती आराखडा तयार करणे, नादुरुस्त व वापरात नसलेल्या शौचालय धारक कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, दिपावली भाऊबीज भेट कार्यक्रम, सदर कालावधीत गाव हागणदारी मुक्त होतील अशा ग्रामपंचायतींचा पंचायत समिती स्तरावरील सार्वजनिक कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात येईल. हागणदारी मुक्त गावाचे फलक लावण्यात येतील, असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Web Title: Ministry of Minority Affairs for Women's Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.