अल्पवयीन मुलीची परराज्यात सात वेळा विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 04:01 AM2020-01-09T04:01:41+5:302020-01-09T04:01:47+5:30
घरासमोर खेळत असलेल्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला दहा वर्षापूर्वी गुंगीचे औषध देऊन हरियाणाला पळवून नेण्यात आले.
चंद्रपूर : घरासमोर खेळत असलेल्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला दहा वर्षापूर्वी गुंगीचे औषध देऊन हरियाणाला पळवून नेण्यात आले. मागील दहा वर्षांच्या काळात तिची सातवेळा विक्री करुन लग्न लावून दिल्याचा विदारक प्रकार चंद्रपूर पोलिसांनी उघडकीस
आणला. रामनगर पोलिसांनी पीडित मुलीची हरियाणातील फतेहबाद येथून सुटका करुन मंगळवारी दोघांना तर बुधवारी एका महिलेला अशा एकूण तीन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सावित्री मुजुमदार (५५), जान्हवी राय (४२), गीता मुजुमदार असे
अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
२०१० रोजी घरासमोर खेळत असणाऱ्या मुलीला प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्यात आले होते. जान्हवी नामक महिलेने तिला रेल्वेने हरियाणा येथे नेले. त्यानंतर तिची हरियाणातील एका महिलेच्या सहाय्याने १ ते दीड लाखांत विक्री करण्यात आली. अशाप्रकारे तिची सुमारे सात वेळा विक्री करुन लग्न लावून देण्यात आले. यातून अल्पवयातच तिच्यावर दोनदा मातृत्व लादण्यात आले. मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पीडित मुलीच्या कुटुंबाने रामनगर पोलिसात दिली होती. शोध घेऊनही तिचा थांगपत्ता न लागल्यामुळे पोलिसांनी प्रकरणाची फाईल बंद केली. त्या मुलीवर अत्याचार सुरुच होते. तिने अनेकदा नराधमांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती अपयशी ठरत होती. काही दिवसांपूर्वी तिला फतेहबाद येथे ठेवण्यात आले होते. यावेळी घरमालकाला तिच्या हालचालीवरुन संयश आला. त्याने आस्थेने तिची विचारपूस केली असता तिनेही संपूर्ण आपबिती त्यांना सांगितली. तिचे धक्कादायक वास्तव ऐकून त्यांना पाझर फुटला. त्यांनीची तिला मदतीचा हात दिला. त्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हे प्रकरण हरियाणा पोलिसांपर्यंत पोहचविले. हरियाणा पोलिसांनी चौकशी करून याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना २ जानेवारी रोजी दिली. यानंतर रामनगर पोलिसांनी थेट हरियाणा गाठून त्या पीडिताला चंद्रपूरला आणले आणि तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
>बेपत्ता मुलींची माहिती
चंद्रपूर जिल्ह्यातून आजवरी किती मुली बेपत्ता झाल्या याची माहिती संकलीत करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले असून आरोपींच्या चौकशीतून त्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक चंदा दंडवते यांनी दिली.