अल्पवयीन मुलीला पळविणे पडले महागात
By admin | Published: October 22, 2014 11:15 PM2014-10-22T23:15:07+5:302014-10-22T23:15:07+5:30
आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आरोपींविरुध्द पोलिसांनी पास्को (८) अंतर्गत कारवाई करीत तिघांना अटक केली. चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मजरी (बेगडे)
आरोपींना कोठडी : पास्को अंतर्गत केली कारवाई
खडसंगी : आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आरोपींविरुध्द पोलिसांनी पास्को (८) अंतर्गत कारवाई करीत तिघांना अटक केली. चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मजरी (बेगडे) येथील सदर मुलगी असून ती ७ आॅक्टोबरपासूनच गायब होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजरा (बेगडे) येथील आठव्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी ७ आॅक्टोबरपासून गायब असल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात आले. आईने नातेवाईकांकडे शोध घेतला असता तिचा कुठेही शोध लागला नाही. अखेर आई कौशल्या जीवतोडे हिने १६ आॅक्टोबरला मुलीला पळवून नेल्याबाबतची तक्रार चिमूर पोलिसात केली.
चिमूर पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपींना नागपूर येथील बुटीबोरीमधून ताब्यात घेतले. रुपेश परसराम नेवारे (२०) रा. नवेगाव, प्रमोद विनायक वासनिक रा. टेकेपार व रुपेशचे वडील परसराम गणपत नेवारे (५०) रा. नवेगाव अशी आरोपींची नावे आहेत.
तिन्ही आरोपींविरुध्द भादंविच्या ३६३, ३६६ व पास्को (८) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. घटनेचा तपास ठाणेदार बहादुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम, हवालदार दरेकर करीत आहेत. दरम्यान, चिमूर व वरोरा न्यायालयाला सुटी असल्याने पोलिसांनी आरोपींना चंद्रपूर येथील न्यायालयात हजर केले असता रुपेश नेवारे व प्रमोद वासनिक याला पोलीस कोठडी तर परसराम नेवारे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. (वार्ताहर)