अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून
By admin | Published: April 6, 2017 12:29 AM2017-04-06T00:29:35+5:302017-04-06T00:29:35+5:30
येथील घुग्घुस कॉलरी क्र. २ बंद कोळसा खाणीच्या परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बंद कोळसा खाण परिसरात मृतदेह आढळला : तीन संशयित ताब्यात
घुग्घुस : येथील घुग्घुस कॉलरी क्र. २ बंद कोळसा खाणीच्या परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मृत १५ वर्षीय मुलगी ही घुग्घुस अमराई वॉर्ड येथील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घुग्घुस बंद कोळसा खाण परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस येताच ठाणेदार पगारे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा तरुणीच्या चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले.
दरम्यान एसडीपीओ नायक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तरूणीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय असून या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यापैकी शशिकांत अनिल बेसरकर या संशयिताने पोलिसांनी विचारपूस केली असता गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सद्या त्याला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर प्रकार अत्याचार व नंतर निर्घृणपणे खून करण्यात आल्याची चर्चा असून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुप्तता पाळली जात असून अधिक माहिती मिळू शकली नाही. उद्या या प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)