नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:01+5:302021-04-09T04:30:01+5:30

ब्रम्हपुरी:राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे उचल केलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, ...

Misleading farmers who pay their debts regularly | नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल

Next

ब्रम्हपुरी:राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे उचल केलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची सानुग्रह राशी परतफेड केली जाईल, असे शासनाने सांगितले होते.

परंतु आजतागायत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा परतीचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून सरकारने एकप्रकारे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.

त्यामुळे राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा परतीचा हप्ता त्वरित द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष क्रीष्णा सहारे यांनी केली आहे.

राज्य सरकारने २०२० मध्ये कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सलग तीन वर्षे कर्जाची मुदतीपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची सानुग्रह राशीची परतफेड करू, असे राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशना दरम्यान सभागृहात आश्वासन दिले होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत वरील आश्वासन हवेतच विरले असून सध्या आर्थिक वर्ष संपले तरीसुद्धा नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या सानुग्रह राशीची परतफेड देण्यात आली नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या प्रति तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. पोकळ जाहीरनामे, खोटी आश्वासने हा या सरकारचा धंदा असून निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या सरकारला सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या समस्यांचा त्यांच्या अडचणींचा विसर पडल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांनी सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून होते नव्हते ते विकवाक करून मोठ्या आशेने सलगपणे नियमित कर्जाची परतफेड केली आहे परंतु सरकारला नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांप्रति सध्याच्या परिस्थितीत दयामाया येताना दिसून येत नाही.

बॉक्स

आश्वासन दिले कशाला?

सरकारला जर सदर सानुग्रह राशी द्यायची नव्हती तर भर सभागृहात आश्वासन कशाला दिले, असा प्रतिप्रश्न माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी सरकारला केला आहे.

येत्या काही दिवसात सरकारने जर ५० हजार रुपयांची एकरकमी रक्कम दिली नाही तर भविष्यात विदर्भातील शेतकरी सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

सध्याच्या परिस्थितीत ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी कोरोना, महापूर, अवकाळी या नैसर्गिक आपत्तीने बेजार झाला असतानाच महावितरण कंपनीने वीज वसुलीचा तगादा लावला. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अशा अवस्थेत त्वरित ५० हजार रुपयांची सानुग्रह राशी शासनाने ताबडतोब द्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी केली आहे.

Web Title: Misleading farmers who pay their debts regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.