‘मिशन अंत्योदय’चा कौशल्य रथातून जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:19 AM2017-10-04T00:19:51+5:302017-10-04T00:20:04+5:30
१ ते १५ आॅक्टोबर पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतीमध्ये पथदर्थी ग्रामसमृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १ ते १५ आॅक्टोबर पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतीमध्ये पथदर्थी ग्रामसमृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यामध्ये सर्व गावांमध्ये विविध स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा जागर होत आहे.
या पंधरवड्यात लोकांचा ग्रामसभेत सहभाग व गावाचा विकास आराखडा तयार करणे, स्वच्छता विषयी जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या कामास सुरूवात करणे आणि विविध योजनेची जाणीव जागृती करण्याकरिता कौशल्य रथासह कलापथकाची सोबत असल्याने विकासाची गंगा आपल्या दारी येणार आहे. तिचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी मंगळवारी कौशल्य रथाचे स्वागत करताना केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, गोंडपिपरीचे गटविकास अधिकारी यशवंत मोहितकर, सहाय्यक गटविकास अधिकारी आशा ढवळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांच्या उपस्थित कौशल्य रथाला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
मिशन अंत्योदय अंतर्गत १५७ ग्रामपंचायतीमध्ये पायाभुत सर्वेक्षणाचे काम १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील विविध संसाधने आणि विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीची नोंद ‘समृध्द ग्राम’ या अप्लीकेशनवर आॅनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण गावातील महिला बचत गट सदस्य, ग्राम रोजगार सेवक व एक महाविद्यालयीन विद्यार्थी या चमुमार्फत करण्यात येणार आहे. या सर्व चमूंचे प्रशिक्षण तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाला आवश्यक सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे. गावातील सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचे संकलन झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये माहितीचे प्रमाणीकरण करून त्यानंतर संकलीत माहिती अॅपवर अंतिम आॅनलाईन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे.