ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:33+5:302021-06-18T04:20:33+5:30
पोंभूर्णा : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर ...
पोंभूर्णा : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने हे घडत आहे.
बाजारातील कचरा हटविण्याची मागणी
गडचांदूर : येथील रेल्वे फाटकाजवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बुध्दगुडा गावातील समस्या सोडवा
जिवती : तालुक्यातील बुध्दगुडा हे गाव अनेक समस्येने ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाही. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुध्दगुडा येथील समस्या सोडवाव्या. तसेच रस्ता तयार करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
तोट्यांअभावी पाणी वाया
राजुरा : येथील नागरिकांकडे नळ आहेत. परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हर फ्लो झाल्यानंतर तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. स्थानिक प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या नळाला तोट्या लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी आहे.
पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जडवाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
वाहनावर मोबाइलचा वापर धोकादायक
सिंदेवाही : वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु आजही अनेकजण महामार्गावरील तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठीही धोकादायक ठरणारा आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक नाही
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमादरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गापैकी एक आहे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैना अवस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
घुग्घुस : परिसरात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
घंटागाडीची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरात दररोज सकाळी घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र काही वाॅर्डातील घंटागाडींची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा कचरा रस्त्यावर सांडत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजत आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला कचरा ट्राॅली दुरुस्ती करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी आहे.
रिक्त पदांमुळे योजना पोहोचल्याच नाही
कोरपना : कृषी विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विविध पदे रिक्त असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सुधारित आकृतीबंधानुसार अनेक पदांना मंजुरी आहे. पण पदभरती झाली नाही. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अडचण जात आहे.
नळयोजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावात नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नाही.