अन् आमदार धानोरकरांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठोकले कुलूप
By परिमल डोहणे | Published: November 3, 2023 05:51 PM2023-11-03T17:51:00+5:302023-11-03T17:53:26+5:30
दोन दिवसांचा अल्टिमेटम : थ्री फेज वीजपुरवठ्याच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. संतापलेल्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वरोरा येथील कार्यकारी अभियंता कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोर्चा काढला. चक्क अधिकाऱ्यांनाच खोलीत बंद करून कुलूप ठोकले. त्यानंतर ठिय्या आंदोलन करून हुकूमशाही सरकारचा निषेध केला. यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु, आश्वासन पूर्ण न केल्यास वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांच्या चंद्रपूर कार्यालयाला कुलूपबंद आंदोलन करण्याचा अल्टिमेटम आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला.
रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असल्याने हिंस्र प्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात शेकडो शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेज वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळेबंद आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता; परंतु सरकारकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हे आंदोलन केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बदखल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, भद्रावती काँग्रेस शहराध्यक्ष सूरज गावंडे, माजी नगरसेवक राजू महाजन, वरोरा तालुका महिलाध्यक्ष ऐश्वर्या खामनकर, मोनू चिमूरकर, प्रमोद मगरे, बसंत सिंग, नीलेश भालेराव, मनोहर स्वामी, फिरोज पठाण, प्रमोद काळे, पुरुषोत्तम पावडे, रवींद्र धोपटे, संजय घागी, गणेश घागी, रत्नमाला अहिरकर, माधुरी चिकटे, सविता सुपी, आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. जिल्ह्यात कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणीच्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. म. रा. वि. वि. कंपनीने जिल्ह्यात थ्री फेज वीजपुरवठ्याचे वेळापत्रक घोषित केले आहे. आठवड्यातून चार दिवस आणि तीन दिवस रात्री आठ तास कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात येत आहे; परंतु २४ तास थ्री फेज पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.
महाजनकोकडून ग्रिडमार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री फेज वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, अशी आपली आग्रही भूमिका आहे. दोन दिवसांत मागणी पूर्ण न केल्यास वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांच्या चंद्रपूर कार्यालयाला कुलूपबंद आंदोलन करणार.
- प्रतिभा धानोरकर, आमदार