आमदारांनी घेतला खरीप हंगामपूर्व परिस्थितीचा आढावा
By admin | Published: April 25, 2017 12:24 AM2017-04-25T00:24:43+5:302017-04-25T00:24:43+5:30
खरीप हंगामपूर्व परिस्थितीचा आ. संजय धोटे व आ. बाळू धानोरकर यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केला.
अधिकाऱ्यांना सूचना : शाश्वत शेती हे मिशन असू द्या
चंद्रपूर : खरीप हंगामपूर्व परिस्थितीचा आ. संजय धोटे व आ. बाळू धानोरकर यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केला.
शाश्वत शेती हे येणाऱ्या काळात मिशन असावे. त्यामुळे शासनाच्या उन्नत शेती, समृध्द शेतकरी या धोरणाचा पुरस्कार करीत आगामी खरीपाचे नियोजन करण्यात यावे, शासनाच्या सर्व यंत्रणांनी परस्पराशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी, विजेची व वीज पंपांची उपलब्धता, मागेल त्याला विहीर, आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर भर द्यावा, अशा सूचना आमदार संजय धोटे यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात आज सोमवारी जिल्हास्तरीय खरीप हंगाम बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना शेती क्षेत्राशी निगडीत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय शेती फायद्यात येणार नाही.
त्यामुळे खरीपाचे नियोजन करताना बि-बियाणे, रासायनिक खते, कर्जाचे पुनर्गठन, कर्जाची परतफेड, किसान क्रेडीट कार्ड वाटप, राज्य व केंद्राच्या विविध योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजना, पशुधनाकरिता चारा नियोजन आदी सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लाभ भेटून त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी आपली सेवा वापरावी, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला आमदार सुरेश धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, प्रकल्प संचालक (आत्मा) विद्या यावेळी जिल्हयातील खरीप हंगामासाठी बियाणाची उपलब्धता, खते, हवामानाचा अंदाज, जिल्हयातील कृषी केंद्राची तपासणी, गुणनियंत्रण, भरारी पथकांचे गठण, गोदामांची उपलब्धता, विज पंपाची सद्यस्थिती, सिंचन आदी बाबींचा घटकवार आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रलंबित विद्युत मीटर, खते व बियाण्यांची उपलब्धता व बँकेचे कर्ज आदी विषयावर उपस्थित सदस्यांनी चर्चा केली. सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले
असे आहे यंदाचे खरीप नियोजन
सन २०१७-१८ मध्ये खरीप हंगामाकरिता चार लाख ७६ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात एक लाख ८० हजार ३६८ हेक्टर, सोयाबीन ८० हजार ७९३ हेक्टर, कापूस एक लाख ६९ हजार ३४९ हेक्टर, तूर ४९ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हयाला विविध पिकांकरिता एकूण ७५ हजार ९९९ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. जिल्हयास खरीप हंगामाकरिता एक लाख २२ हजार ६०० मे.टन रासायानिक खतांचे आवंटन असून जिल्हयात ६ एप्रिलपर्यंत १६ हजार ८०७ मे.टन खत उपलब्ध झाले आहे. यापैकी ९१३ मे.टन खताची विक्री झाली असून १५ हजार ८९४ मे.टन रासायानिक खत शिल्लक आहे.
१६ भरारी पथकांची निर्मिती
शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठा वाजवी दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १५ अशा एकूण १६ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.हसनाबादे यांनी दिली.