मनपा शाळांच्या पटसंख्येत ३०० ने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:19 PM2018-06-29T23:19:03+5:302018-06-29T23:20:15+5:30
शहरातील कॉन्व्हेंट शाळांनी दामदुप्पट शुल्क आकारून दर्जेदार शिक्षण देत असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे बहुतांश पालक याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लावून मुलांच्या भविष्यासाठी वाट्टेल ते दिव्य सोसायला तयार असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील कॉन्व्हेंट शाळांनी दामदुप्पट शुल्क आकारून दर्जेदार शिक्षण देत असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे बहुतांश पालक याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लावून मुलांच्या भविष्यासाठी वाट्टेल ते दिव्य सोसायला तयार असतात. त्यामुळे महानगर पालिकेच्या मराठी प्राथमिक शाळांवर अवकळा येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र या सत्रात मनपा शाळांची पटसंख्या वाढल्याने ही भीती निरर्थक ठरली. २०१७- १८ या सत्रातील पटसंख्येच्या तुलनेत यंदा नव्याने ३०० विद्यार्थ्यांची भर पडली. सहा शाळांच्या मुख्याध्यापकांनी वाढीव वर्गखोल्या बांधून देण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
मुलांच्या शैक्षणिक भविष्याविषयी नोकरदार वर्गापासून तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही आता जागरूकता वाढली. तालुकास्थळांसोबतच मोठ्या गावांतही इंग्रजी कॉन्व्हेंट शाळांचा सुळसुळाट झाला. तथाकथित दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली भरसाठ शुल्क आकारले जात आहे. खुल्या अर्थव्यवस्थेने जीवनाच्या सर्वच क्षेत्रात बाजारीकरण केले. टोकाची स्पर्धा वाढली. आम्हीच दर्जेदार शिक्षण देतो, असा दावा करून खासगी संस्थाचालकांनी अने क्लासेस सुरू केल्या. यातून पालकांच्या उरात धडकी भरली. जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगरपरिषदांच्या शाळेत मुलांना शिकायला पाठवून करिअर वाया दवडायचे का, ही मानसिकता तयार झाली. चंद्रपूर शहरात तर मागील एक दशकात कॉन्व्हेंट शाळांनी हैदोस सुरू केला. मनपाच्या शाळांना विद्यार्थीच मिळनासे झालेत. यापासून धडा घेवून आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर व काही ध्येयवादी शिक्षकांनी नाविण्यपूर्ण योजनांची आखणी केली. त्याचे विधायक परिणाम यंदाच्या शैक्षणिक सत्रात दिसून आले आहेत. मनपाच्या ३१ शाळांपैकी १० शाळांमध्ये आश्चर्यकारक पटसंख्या वाढली. गतवर्षी २ हजार ४७० विद्यार्थी शिकत होते. यंदा ही संख्या २ हजार ७०० पेक्षाही जादा झाली आहे.
-अन् खासगी कॉन्व्हेंट शाळा सोडली !
आर्थिकदृष्ट्या सधन असणाऱ्या शहरातील काही पालकांनी तथाकथित नामांकित इंग्रजी शाळेत मुलांना दाखल केले होते. मात्र, यंदाच्या शैक्षणिक सत्रात बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजी कॉन्व्हेंट शाळा सोडून मनपाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला. यामध्ये सावित्रीबाई फु ले विद्यालय बाबूपेठ, शहिद भगतसिंग विद्यालय भिवापूर, पंडित नेहरू विद्यालय इंदिरानगर एमईएल, महात्मा जोतिबा फु ले विद्यालय घुटकाळा, राजेंद्रप्रसाद विद्यालय अंचलेश्वर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा समावेश आहे. खासगी शाळा सोडणाºया विद्यार्थ्यांचे पालक नोकरदार आहेत हे विशेष.
कसा घडला बदल?
मागील सत्रात शिक्षकांचे विशेष उद्बोधन वर्ग घेण्यात आले. पालक व विद्यार्थी संपर्क वाढविण्यात आला. कॉन्व्हेंट संस्कृतीनुसार शाळांमध्ये बदल केले. सरसकट सर्वच समाजातील विद्यार्थ्यांना मोफ त गणवेश दिले. २८ शाळांच्या इमारतींची शिक्षणपूरक सजावट केली. ३ शाळांची मनपाकडून विशेष चित्रसजावट तर ५ शाळांनी लोकवर्गणीतून केले इमारतींना लक्षवेधी आकार देण्यात आला.
बाबूपेठ येथील सावित्रीबाई फु ले विद्यालय १०० टक्के ई- लर्निंग, प्रत्येक शाळेला टिव्ही संच आणि मैदान उपलब्ध असलेल्या २४ शाळांमध्ये क्रीडासाहित्य देण्यात आले. मनपाने सेमी इंग्लिश अभ्यासक्रम व नर्सरी केजी १ ते २ ची सुरूवात केल्याने हा बदल झाला, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी दिली.