महापरीक्षा विरोधात मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:00 AM2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्पर्धा परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने महापरीक्षापोर्टलचे खाजगी कंपनीला कंत्राट दिले. मात्र या कंपनीद्वारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्पर्धा परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने महापरीक्षापोर्टलचे खाजगी कंपनीला कंत्राट दिले. मात्र या कंपनीद्वारे सर्वत्र सावळा गोंधळ झाला असून विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे. सदर पोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, पोर्टल बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची इशाराही यावेळी देण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी संघटनेने जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विवेक धोटे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पोर्टलबाबत तीव्र असंतोष असल्याने या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.
या पोर्टलचे अनेकवेळा सर्व्हर डाऊन राहते, प्रत्येक परीक्षेवेळी नवीन प्रोफाईल बनवून नव्याने माहिती भरावी लागते, आॅनलाईन परीक्षेसाठी अतिरिक्त फी आकारली जाते, परीक्षा देण्यासाठी अनेकवेळा उमेदवारांना दुसºया जिल्ह्यात जावे लागते, वेळेवर सूचना न देणे, लहान व खाजगी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसणे, अपुरी सुरक्षा, वेळेवर परीक्षा न घेणे, निकाल उशिरा लावणे, डमी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविणे, खासगी संगणक सेंटरमध्ये परीक्षा घेणे, बी.ए., बी.कॉमचे विद्यार्थी पर्यवेक्षक असणे, अनुपस्थित विद्यार्थ्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत असणे, असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहे. त्यामुळे या अनागोंधी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल त्वरित रद्द करावे, महापोर्टल कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, पदभरती एमपीएससी तर्फे घ्याव्या, गोंधळ व गैरप्रकार झालेल्या परीक्षा रद्द कराव्या, संयुक्त परीक्षा रद्द करून स्वतंत्र परीक्षा घ्यावी, जाचक अटी रद्द कराव्या, रिक्त जागांवर त्वरित पदभरती करावी, प्रलंबित असलेले परीक्षांचे निकाल त्वरित लावावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
शिष्टमंडळात मनसेच्या सुनीता गायकवाड, भरत गुप्ता, प्रकाश नागरकर, प्रतिमा ठाकूर, मनोज तांबेकर, नितेश जुमडे, राकेश बोरीकर, नितीन पेंदाम, चैतन्य सदाफळ, निखिल परबत, अनुप माथनकर, अविनाश रोडे, ऋषिकेश बालमवार, शिरीष मानेकर, करण नायर आदींची उपस्थिती होती.