मोबाईल गहाळ प्रकरणाचा वाद विकोपाला
By admin | Published: August 27, 2014 11:23 PM2014-08-27T23:23:21+5:302014-08-27T23:23:21+5:30
स्थानिक रोहित बिअरबार व रेस्टारंटमधून चोरीस गेलेल्या मोबाईलचे प्रकरण पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर मारहाणीपर्यंत पोहोचले आहे. पंचायत समिती सदस्यांचा सहभाग असलेल्या
गोंडपिंपरी : स्थानिक रोहित बिअरबार व रेस्टारंटमधून चोरीस गेलेल्या मोबाईलचे प्रकरण पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर मारहाणीपर्यंत पोहोचले आहे. पंचायत समिती सदस्यांचा सहभाग असलेल्या या भांडणाचे हे प्रकरण चर्चेचे ठरत आहे.
सदर बिअरबार पंचायत समिती सदस्य रामचंद्र कुरवटकर यांच्या मालकीचे आहे. कुणाल गायकवाड यांनी या बारमधून मोबाईल चोरी गेल्याची तक्रार पोलिसात केली होती. त्यावर त्यांनी मोबाईल चोरीच्या आरोपाचे खंडन करुन हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे सांगितले होते. या मुद्यावरून काल मंगळवारी रात्री गायकवाड व कुरवटकर यांच्यात रंगलेला शाब्दिक वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात दोघांनीही एकमेकांविरूद्ध तक्रारी केल्याने पोलिसांनी दोघांवरही गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.
रोहित बारमधून मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार कुणाल गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात पोलिसात केली होती. त्यावर, हा ग्राहकाचा निष्काळजीपणा असल्याचे सांगत बारची बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचे रामचंद्र कुरवटकर यांनी म्हटले होते. या प्रकरणावरून काल सायंकाळी शिवाजी वार्ड क्र. ३ मधील मूल रोड स्थित एका पानटपरीवर कुणाल गायकवाड व पंचायत समिती सदस्य कुरवटकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कुरवटकर यांनी कुणाल गायकवाडविरोधात जीवे मारण्याची धमकी, लाकडी काठीने मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार केली. तर रामचंद्र कुरवटकर, बार मॅनेजर संजय चंदेल व इतर दोन जणांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार गायकवाड यांनी दाखल केली आहे. कुरवटकर व सहकाऱ्यांवर भांदवि कलम ३०७ तर, गायकवाडविरोधात ५०४,५०६, ३२४ गुन्ह्याची नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)