गावच्या ‘मॅडम’ला शिकविणार मोबाईल
By admin | Published: September 25, 2016 01:20 AM2016-09-25T01:20:47+5:302016-09-25T01:20:47+5:30
अनेक उच्च शिक्षित महिलांकडे मोबाईल असला तरी तो अनामिक भीतीपायी पर्समध्येच असतो.
शिक्षण विभागाचा सुधारणावाद : शिक्षकांसाठी कार्यशाळा
राकेश बोरकुंडवार सिंदेवाही
अनेक उच्च शिक्षित महिलांकडे मोबाईल असला तरी तो अनामिक भीतीपायी पर्समध्येच असतो. त्यामुळे त्याचा वापर फारच कमी होतो. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना हा भित्रेपणा परवडणारा नाही. अध्यापनात आता मोबाईलचा वापर वाढतोय. परिणामी शिक्षण विभाग गावोगावच्या शिक्षकांना चक्क मोबाईल वापराचे प्रशिक्षण देणार आहे.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जशी झपाट्याने क्रांती होत आहे, तसाच शिक्षण क्षेत्रातही बदल होत आहे. किंबहुना तंत्रज्ञान आणि शिक्षण हातात हात घालून पुढे झेपावत आहे. शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’, या अभियानात तर तंत्रज्ञानाशिवाय पर्यायच नाही. अध्यापन करताना पारंपारिक खडू-फळ्यासोबतच व्हाईट बोर्ड, संगणक, लॅपटॉप अशा आधुनिक साधनांचा वापर होत आहे. त्यातल्या त्यात कमी खर्चात शाळा डिजिटल करताना मोबाईल अत्यंत महत्त्वाचा ठरला. मात्र ग्रामीण भागात अध्यापन करणाऱ्या अनेक शिक्षकांना अद्यापही अॅण्ड्राईड मोबाईल निट हाताळता येत नाही. त्यामुळे नव्या अध्यापन पद्धतीत त्यांना अवघडलेपणा जाणवतो. जि.प. शाळांमध्ये काम करणाऱ्या शेकडो शिक्षिका मोबाईल बाळगतात. मात्र केवळ ‘मी शाळेतून निघाले, मी अर्धा तासात घरी पोहोचते’, एवढे सांगण्यापुरता मोबाईल वापरला जातो.
अॅण्ड्राईड मोबाईलमधील कित्येक उपयुक्त फॅक्शन अजूनही त्यांना वापरता येत नाही. उत्तम अध्यापन कौशल्य असूनही प्रत्यक्ष वर्गात त्याचा वापर होत नाही. ही स्थिती दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षिकांना प्रशिक्षण देण्याचा विचार घेतला असल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर ही प्रशिक्षण कार्यशाळा दिवाळीनंतर होण्याचे संकेत आहे. कार्यशाळेमध्ये प्रत्येक महिला शिक्षिकेला स्वत:चा मोबाईल आणि त्यात नेट पॅक टाकुन उपस्थित राहावे लागणार आहे. महिला शिक्षिकांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षिक करण्यासाठी प्रामुख्याने तंत्रस्नेही शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)