विविध मुद्यांवरून गाजली आमसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 12:54 AM2017-02-17T00:54:22+5:302017-02-17T00:54:22+5:30
आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीला समोर ठेवून आज गुरुवारी मनपाच्या सभागृहात आयोजित
डस्टबीनवरून गोंधळ : चालू टर्ममधील अखेरची आमसभा
चंद्रपूर : आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीला समोर ठेवून आज गुरुवारी मनपाच्या सभागृहात आयोजित आमसभा विविध मुद्यांवरून चांगलीच गाजली. यात हागणदारीमुक्ती, डस्टबीन खरेदी, गुंठेवारी, दुकान गाळे आदी विषयांचा समावेश होता.
आमसभेला सुरुवात होताच महापौर राखी कंचर्लावार यांनी या सत्रातील ही शेवटची सभा असल्याचे घोषित केले. त्यानंतर विषय सूचीतील विषयाला सुरुवात करण्यात आली. मात्र त्यापूर्वीच नगरसेवक संजय वैद्य यांनी डस्टबीन खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. कमी गुणवत्ता असलेले डस्टबीन पुरविण्यात आले असून यामुळे नागरिकांच्या रोषांना नगरसेवकांना सामोरे जावे लागणार असल्याचे वैद्य यांनी म्हटले. याला नगरसेवक नंदू नागरकर व प्रशांत दानव यांनी दुजोरा दिला. त्यामुळे यावरून काही वेळ गोंधळ उडाला. त्यानंतर हागणदारीमुक्तीचा विषय उपस्थित करण्यात आला. शहरात शौचालयांचे उद्दिष्टच पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहर हागणदारीमुक्त कसे होईल, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. याबाबत माहिती देताना आयुक्त संजय काकडे म्हणाले, आतापर्यंत पाच हजार २०० खासगी शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. २१ सार्वजनिक शौचालयांचेही पुनर्बांधकाम करण्यात आले असून त्याचा वापरही होत आहे. राज्यस्तरीय समितीने शहराला हागणदारीमुक्तीचा दर्जा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपा नगरसेवक अंजली घोटेकर यांनी नगरसेवक संजय वैद्य यांच्यावर थेट आरोप केला. कोणत्याही विकासकामावर चर्चा सुरू झाली की वैद्य त्यात काही ना काही त्रुट्या काढतात, असे घोटेकर यांनी म्हणताच वैद्य आणि घोटेकर यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली.
गुंठेवारी अंतर्गत नागरिकांची घरे नियमित करण्याचा मुद्दाही चर्चेला येऊन चांगलाच गाजला. नगरसेवक वैद्य यांनी गुंठेवारीची मुदत वाढविण्यासाठी आमसभेत मंजुरी घेण्यात आली नसल्याचे सांगत याला मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली. नगरसेविका सुनिता लोढिया यांनी त्यांच्या प्रभागात आरक्षित जमिनीवर बगिचाची निर्मिती केली जात आहे. या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप केला. यावर अंजली घोटेकर यांनी ज्या नगरसेवकांना आक्षेप आहे, त्यांच्या प्रभागात गुंठेवारीला मंजुरी देऊ नका, मात्र ज्यांना आक्षेप नाही, तेथे मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली. नगरसेविका अमरजित कौर धुन्ना यांनीही याला समर्थन दिले. गोलबाजारासह अन्य ठिकाणातील मनपाचे गाळे संबंधित व्यापाऱ्यांनी इतरांना विकून टाकले आहे, यावरही सभागृहात चर्चा झाली. (शहर प्रतिनिधी)
‘त्या’ सातशे एकर जमिनीवर चर्चा
वेकोलिला कोल बियरिंग अॅक्टमध्ये येत असलेल्या सुमारे सातशे एकर जागेला निवासी क्षेत्रमध्ये समाविष्ट करण्याचा मुद्दा नगरसेवक नंदू नागरकर व प्रशांत दानव यांनी उपस्थित केला. या संदर्भात नगरसेवक रामु तिवारी म्हणाले, सदर विषय प्रशासनाद्वारे विषयसूचीमध्ये टाकण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनानेच उत्तर द्यावे. त्यावर आयुक्त काकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा उल्लेख करीत सदर जमीन पालिकेची नसल्याचे सांगितले. त्यामुळे मनपाच्या होकार किंवा नकाराने काही फरक पडत नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडूनच हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे, असेही काकडे यांनी सभागृहात स्पष्ट केले. मात्र या विषयावर चांगलाच गदारोळ झाला.