लोहाऱ्याच्या जंगलात मोहा दारूचा कारखाना
By admin | Published: September 23, 2015 04:43 AM2015-09-23T04:43:51+5:302015-09-23T04:43:51+5:30
रामनगर पोलिसांनी मंगळवारी तब्बल चार तास कोंबिंग आॅपरेशन राबवून लोहारा जंगलातून २१ ड्रम मोहा दारू हुडकून
चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी मंगळवारी तब्बल चार तास कोंबिंग आॅपरेशन राबवून लोहारा जंगलातून २१ ड्रम मोहा दारू हुडकून काढली. विशेष म्हणजे हे दारूचे ड्रम घनदाट जंगलात खड्डा करून दडवून ठेवले होते. ही दारू दोन हजार लिटर असून त्याची किंमत पाच लाख १४ हजार रूपये सांगितली जाते. या प्रकरणी पोलिसांनी लोहारा येथील पाच व्यक्तींना अटक केली असून चार जण फरार आहेत.
दारूबंदीविरूद्ध पोलिसांनी गावात कंबर कसली असतानाच दुसरीकडे दारूविक्रेत्यांनी जंगल गाठल्याचे आता या घटनेतून उघड झाले आहे. असे असले तरी ज्यांच्याकडे जंगल राखण्याची जबाबदारी आहे, ते वनविभाग आणि त्यांचे अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित झाला आहे.
रामनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून लोहारापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावरील जंगलात मंगळवारी सकाळी ८ वाजता पोलिसांच्या पथकाने कोंबिंग आॅपरेशन सुरू केले. यात परिविक्षाधिन पोलीस उप अधिक्षक सुशिल नायक आणि पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या नेतृत्वात ही मोहिम राबविण्यात आली. अशातच रामनगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुप्त माहितीवरून कोंबिंग आॅपरेशन राबविले. दुपारी बारा वाजता या शोधमोहिमेला यश आले.
अगदी घनदाट जंगलात पोलिसांना खड्ड्यात दडवून ठेवलेले दारूच्या सडव्याचे २१ ड्रम सापडले. या सोबतच, मोहाफुले, सडवा, दारू गाळण्याचे साहित्य आदी साहित्यही आढळले. पोलिसांनी ते कारवाईनंतर जंगलातच नष्ट केले. जंगलातच हातभट्टी तयार करून दारू गाळली जात होती आणि सोईस्करपणे ड्रममध्ये भरून मागणीनुसार ती ग्राहकांना पुरविली जात होती, अशी माहिती आहे.
हे घबाड हाती लागल्यावर पोलिसांनी अचानकपणे लोहारा गावात धाड घालून पाच जणांना अटक केली. मात्र पोलिस गावात आल्याची कुणकूण लागताच चार जण पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी या सर्वाविरूद्ध गुन्हे दाखले केले आहेत.
या मोहिमेच्या यशस्वितेसाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. यात पििवक्षाधिन पोलीस उपअधिक्षक नायक आणि ठाणेदार चव्हाण यांच्यासह पाच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि ५२ पोलीस शिपायांचा समावेश होता.
या पथकातील सर्वांना अगदी ऐन वेळी माहिती देवून हे कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात आले. ऐन जंगलामध्ये मोहा दारूचा एवढा मोठा साठा आढळण्याची दारूबंदीच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांत पाच गुन्ह्यांची नोंद केली असून प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जंगलाकडे वाढली होती
दारुड्यांची गर्दी
मागील काही दिवसांपासून जंगलाकडे दारूड्यांची गर्दी वाढली होती. गावात दारू मिळणे आणि ती चोरून विकणे दुरापस्त झाल्याने दारूविक्रेत्यांनी हा सोईस्कर मार्ग शोधला होता. अलिकडे लोहारा परिसरात दारूड्यांची गर्दी आणि येरझारा वाढायला लागल्याने पोलिसांना याची भनक लागली. यावरून ही कारवाई करण्यात आली.
वनविभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत कसे ?
अगदी घनदाट जंगलात मोहा दारूने भरलेले एक नव्हे तर २१ ड्रम आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. जंगलाच्या रक्षणासाठी वनविभाकडे मोठी फौज आहे. तरीही दाट जंगलात दारूच्या भट्ट्या पेटतात, दारूचा साठा जमिनीत गाडून ठेवला जातो, सुरक्षितपणे बाहेरही काढला जातो. या अपयशाचे वाटेकरी निव्वळ वनविभागाचे अधिकारीच असल्याचे म्हटले जात आहे.