लॉकडाऊनमध्ये मोहफुल दारुविक्रेते सक्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:24+5:30
सिंदेवाही येथील सरडपार नाल्याजवळ पोलिसांनी छापा टाकून ८० प्लास्टिक ड्रॉममध्ये चार हजार किलो मोह सडवा, ३० नग मातीच्या मटक्यामध्ये ७५० किलो मोह सडवा असा एकूण ११ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, ठाणेदार रामटेके, पोलीस उप निरिक्षक सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक नेरकर, पोलीस उपनिरिक्षक पाटील आदींनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनच्या काळात हातभट्टीद्धारे मोहफुलाची दारु काढून विक्री करणारे दारुविक्रेते सक्रीय झाले. याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील पोलिसांनी विशेष मोहिम राबवून दुर्गापूर, सिंदेवाही, चंद्रपूर येथे धाड टाकून २३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुर्गापूर येथील इरई नदीजवळील पायली शिवारात मोहफुलाची हातभट्टी सुरु असल्याच्या माहितीवरुन ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात धाड टाकून ४० प्लास्टिक ड्राम चार हजार लिटर मोहसडवा, ३० प्लास्टिकच्या छोट्या ड्राममध्ये ६०० लि. मोह सडवा, एक दुचाकी असा १० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक प्रवीण सोनोणे, पोहवा सुनील गौरकार, अशोक मंजुळकर, पोना उमेश वाघमारे यांनी केली.
सिंदेवाही येथील सरडपार नाल्याजवळ पोलिसांनी छापा टाकून ८० प्लास्टिक ड्रॉममध्ये चार हजार किलो मोह सडवा, ३० नग मातीच्या मटक्यामध्ये ७५० किलो मोह सडवा असा एकूण ११ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, ठाणेदार रामटेके, पोलीस उप निरिक्षक सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक नेरकर, पोलीस उपनिरिक्षक पाटील आदींनी केली.
रामनगर पोलिसांनी लोहारा जंगल परिसरात धाड टाकून एक लाख तीन हजार रुपयांचा तर महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात धाड टाकून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हीकारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.