कोंडवाड्याअभावी मोकाट जनावरे शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:48+5:302021-06-21T04:19:48+5:30
शेतपिकाचे नुकसान : नगरपंचायत दुर्लक्ष सिंदेवाही : नगरपंचायत हद्दीत असलेला कोंडवाडा मोडकळीस आला आहे. सध्या मोकाट जनावरे कुठे ...
शेतपिकाचे नुकसान : नगरपंचायत दुर्लक्ष
सिंदेवाही : नगरपंचायत हद्दीत असलेला कोंडवाडा मोडकळीस आला आहे. सध्या मोकाट जनावरे कुठे टाकायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरे शेतपिकाचे मोठे नुकसान करीत आहे.
नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या राम मंदिर रोडवर जुना कोंडवाडा आहे. पण, तो संपूर्ण मोडकळीस आला आहे. त्याला नूतनीकरण करण्याची गरज असून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांपासून शेतपिकाचे नुकसान होत आहे. जनावरे शहरात मोकाट फिरत आहे. आता तर शेतीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे पेरली आहे. कोवळी पिके शेतात असून अनेक पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडत असल्याने ही जनावरे शेतात जाऊन पिकाचे मोठे नुकसान करीत आहे. शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. तसेच मोकाट जनावरे शहरातील हायवे रोड, बाजार चौक येथे मोकाट दिसतात. कोंडवाडा बंद असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न काही लोकांना पडला आहे. शेतकऱ्यांसमोर पिकांचे होणारे नुकसान पाहता कोंडवाडा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.