अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांचा कारावास
By साईनाथ कुचनकार | Published: July 3, 2023 06:22 PM2023-07-03T18:22:58+5:302023-07-03T18:23:40+5:30
तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास सहा महिन्याची अतिरिक्त शिक्षा
चंद्रपूर : घराबाहेर अंगणात झोपून असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी मनोज शंकर आडपेवार (३८) चंद्रपूर याला न्यायालयाने तीन वर्ष कारावास आणि तीन हजार रुपयाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास सहा महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.
रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जलनगरमध्ये एक अल्पवयीन मुलगी अंगणामध्ये झोपून असताना आरोपी मनोज आडपेवार याने दारूच्या नशेमध्ये तिचा विनयभंग केला. ही घटना २५ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली. घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलिस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वावडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक शामराव पोईनकर, पंजाबराव मडावी यांनी काम बघितले.
दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाची तपासणी तसेच साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपी मनोज शंकर आडपेवार याला तीन वर्ष कारावास, तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणीत सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. देशपांडे यांनी काम बघितले.