पैसा झाला खोटा; दहा रुपयांचे नाणे चालेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 05:00 AM2021-09-22T05:00:00+5:302021-09-22T05:00:27+5:30
रिझर्व बॅंकेने दहा रुपयांचे नाणे २००९ मध्ये चलनात आणले होते. मात्र बरेचदा हे नाणे बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आली. ग्रामीण भागात ही अफवा तर वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे आरबीआयने दहा रुपयांचे नाणे बंद झाले नसून चलनात वैध असल्याचे स्पष्ट केले. दहा रुपयांची १४ प्रकारची नाणी वैध असून सर्वांनीच त्याचा चलनात उपयोग करावा, असे आवाहन रिझर्व बॅंकेने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दहा रुपयांचे नाणे सुरुच असून ते चलनाचा एक भाग आहेत. असा निर्वाळा रिझर्व बँकेने दिला असला तरी जिल्ह्यातील किरकोड व्यावसायिक तसेच ग्राहकांकडून दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. रिझर्व बँकेने सन २००९ मध्ये दहा रुपयांची नाणी चलनात आणली. ते नाणे आताही चलनात आहे. मात्र अनेकजण त्याचा स्वीकार करत नसल्याने अनेकांजवळ नाणी संग्रहीत होऊन आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात किरकोळ व्यावसायिक व ग्राहकही दहा रुपये नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्याचे अनेकदा बघायला मिळते.
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
रिझर्व बॅंकेने दहा रुपयांचे नाणे २००९ मध्ये चलनात आणले होते. मात्र बरेचदा हे नाणे बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आली. ग्रामीण भागात ही अफवा तर वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे आरबीआयने दहा रुपयांचे नाणे बंद झाले नसून चलनात वैध असल्याचे स्पष्ट केले. दहा रुपयांची १४ प्रकारची नाणी वैध असून सर्वांनीच त्याचा चलनात उपयोग करावा, असे आवाहन रिझर्व बॅंकेने केले आहे.
कोणती नाणी नाकारतात
सध्या चलनात असलेल्या नाण्यांपैकी एक, दोन, पाच रुपयांची नाणी सर्वजण बिनदिक्कत स्वीकारतात. मात्र दहा रुपयांची नाणी घेण्यास अनेकजण नकार देतात. एखाद्या वेळेस दहा रुपयांची जुनी नाणी स्वीकारतील, परंतु, पितळ व स्टेलनेस स्टील असे दुहेरी आवरण असलेली नाणी स्वीकारण्याचे टाळतात.
बँकामध्येही नाण्यांचा मोठा साठा
बाजारपेठेत किंवा अनेक ठिकाणी दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास अनेकदा नकार मिळतो. मात्र बँकेमध्ये हे नाणे स्वीकारले जाते. त्यामुळे बॅंकांमध्ये दहा रुपयांच्या नाण्यांचा मोठा साठा उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात नाणी जमा करायची असल्यास ती कुठून आली, याचे कारण बॅंकेत सादर करावे लागते.
पैसा असूनही अडचण
माझी मुलगी पिग्मी बॅगमध्ये पैसे गोळा करायची. त्यामध्ये केवळ दहा व पाच रुपयांचे नाणे टाकायची. काही महिन्यांनंतर ते पैसे काढले. परंतु, कोणतीही खरेदी करावयास गेल्यास नाणी स्वीकारतच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही नाणी करायची काय, असा प्रश्न आहे.
-राकेश रायपुरे
भाजीपाला विक्रेते किंवा किरकोळ विक्रेते दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे कोणीही जर आपणाला दहा रुपयांचे नाणे देत असेल तर घेण्यास भीती वाटते. त्यामुळे शक्यतो दहा रुपयांची नाणी घेण्यास अनेक जण टाळाटाळ करतात.
- संघर्ष सिद्धमशेट्टीवार
रिझर्व बॅंकेकडून चलनात आलेले दहा रुपयांचे नाणे बंद झाले नाही. याबाबत अनेकदा जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज न बाळगता दहा रुपयांच्या नाण्याचा व्यवहारात वापर करावा. बॅंकेतसुद्धा दहा रुपयांची नाणे स्वीकारले जातात.
-ब्रिजेश बांबोळे, सहायक व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया, चंद्रपूर