माकडांच्या हैदोसाने नागरिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:45 PM2017-11-06T23:45:48+5:302017-11-06T23:46:06+5:30
बफर झोन क्षेत्रात ७९ गावे आहेत. यातील बहुतांश गावात सध्या माकडांनी हैदोस घातला आहे. अनेक घरांच्या छपरांचे नुकसान करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : बफर झोन क्षेत्रात ७९ गावे आहेत. यातील बहुतांश गावात सध्या माकडांनी हैदोस घातला आहे. अनेक घरांच्या छपरांचे नुकसान करीत आहेत. परसबागेतील भाजीपाला नष्ट करीत आहेत. अनेक ठिकाणी तर नागरिकांवरही माकडांनी हल्ले केल्याची माहिती आहे.
बफर झोन क्षेत्रातील मूल, लोहारा, मोहुर्ली, खडसंगी, शिवणी, पळसगाव रेंजअंतर्गत काही गावात माकडाचा धुमाकूळ सुरू आहे. जंगलातील माकडाचा मोर्चा आता गावाकडे वळला असून नागरिकांचे मोठे नुकसान करीत आहेत. पूर्वी माकडे गावात फार कमी यायचे. त्यांचा वावर जंगलातच अधिक असायचा. मात्र मागील दोन ते तीन वर्षेपासून माकडे गावात वास्तवास असल्याचे दिसून येत आहे. त्यांना मानवाची काहीच भीती उरलेली नाही. आता तर माकडांनाच नागरिक घाबरताना दिसून येत आहे. गावागावात माकडे कळपाने प्रवेश करतात. गावात आल्यानंतर घरा-घरावरून उडी घेऊन छतावरील कवेलू फोडतात. यामुळे अनेकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. माकडे एवढे धीट झाले आहेत की एखाद्याने त्यांना हुलकावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरच हल्ला करतात. गावात लहान बालके, महिला तर त्यांना हुलकावून लावूच शकत नाही. माकडांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती आहे. अनेक नागरिकांनी आपल्या परसबागेत भाजीपाल्यांची लागवड केली आहे. मात्र माकडे या भाजीपाल्यांची नासधूस करीत आहेत. अंगणातील पेरू, शिताफळे खाऊन फस्त करीत आहेत. माकडामुळे नुकसान झाले तर वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वनविभागाने गावात येणाºया माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.