मनपाची मान्सूनपूर्व नाले सफाई
By admin | Published: May 1, 2017 12:45 AM2017-05-01T00:45:19+5:302017-05-01T00:45:19+5:30
शहरातील मोठे व लहान नाले व भूमिगत नाल्याचे चेंबर युद्धस्तरावर सफाई करण्याच्या मनपा आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे नाल्यांवर ज्यांचे अतिक्रमण आहे
भूमिगत नाल्यांची दुरुस्ती : आयुक्तांनी घेतला आढावा
चंद्रपूर : शहरातील मोठे व लहान नाले व भूमिगत नाल्याचे चेंबर युद्धस्तरावर सफाई करण्याच्या मनपा आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे नाल्यांवर ज्यांचे अतिक्रमण आहे अश्यांची पाहणी करून तातडीने अतिक्रमण काढण्यात येत आहे. तसेच तुटफुट झालेल्या ठिकाणी नाले त्वरित दुरुस्ती करणे, ज्या ठिकाणी नाल्याचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो तिथे जागा खोलगट करून पाण्याचा मार्ग मोकळा करणे, मोठ्या नाल्यावर जेसीबी व पोकलॅन मशिने नाले सफाई आणि नाल्यामधून निघालेला गाळ त्वरित उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शहरात मान्सूनपूर्व मोठे व लहान नाले सफाई करण्याच्या दृष्टीने पालिका आयुक्त संजय काकडे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला सहाय्यक आयुक्त सचिन पाटील, धनंजय सरनाईक, अश्विनी गायकवाड, शहर अभियंता महेश बारई, क्षेत्रीय प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे, सुभाष ठोंबरे, स्वच्छता निरीक्षक, संतोष गर्गेलवार, विवेक पोतनूरवार, भुपेश गोठे, उदय मैलारपवार, बेनहर जोसेफ, प्रदीप मडावी, महेंद्र हजारे उपस्थित होते. त्याअनुषंगाने शहरातील मोठे व लहान नाले मनुष्य बळाद्वारे सफाई करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. झोन-२ येथे स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे यांच्या नेतृत्वात भूमिगत चेंबराची सफाई करण्यात येत आहे. झोन क्र. २ (ब) व झोन क्र. १ येथे स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनूरवार व उदय मैलारपवार यांच्या नेतृत्वात नाले सफाई सुरू आहे.
नाल्यामधून निघालेला गाळ त्वरित उचलून सखाती केंद्र (कंपोस्ट डेपो) येथे टाकण्यास सोयीचे व्हावे, याकरिता स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी यांच्या नियंत्रणाखाली जेसीबी व टिप्पर लावून जागा समतोल करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. मनपा आयुक्त काकडे व शहर अभियंता बारई यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांनी प्रत्यक्ष नाले सफाई कामाची पाहणी केली. (प्रतिनिधी)