माकडांचा धुमाकूळ वनविभाग सुस्त
By admin | Published: January 10, 2016 01:16 AM2016-01-10T01:16:55+5:302016-01-10T01:16:55+5:30
गेल्या वर्षभरापासून माकडांनी ब्रह्मपुरीत हदौस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरावर धुमाकूळ घालून झाडांचे नुकसान केले.
महिला व बाल वर्गात भीती : बंदोबस्त लावण्याची नागरिकांची मागणी
ब्रह्मपुरी : गेल्या वर्षभरापासून माकडांनी ब्रह्मपुरीत हदौस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरावर धुमाकूळ घालून झाडांचे नुकसान केले. तसेच वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे ब्रह्मपुरीकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावरील उपाययोजनेसाठी वनविभाग मात्र सुस्त असल्याने वनविभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.
पूर्वी माकडे गावात यायची व कालांतराने जंगलात निघुन जायची. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांचा त्रास होत नव्हता. परंतु अलिकडे गेल्या वर्षभरापासून माकडांनी मोबाईल टॉवरवर आपले बस्तान मांडले असल्याने माकडे रात्रभर टॉवरवर मुक्काम ठोकतात आणि दिवसभर शहरात धुमाकूळ घालतात. विशेष म्हणजे मोबाईल टॉवर बेवारस आहेत. या ठिकाणी साधा चौकीदारदेखील नाही. त्यामुळे टॉवरवर माकडांसह अन्य प्राण्यांचे बस्तान दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपालिकेने अशा बेवारस टॉवरवर कार्यवाहीचा बडगा उगारून किमान चौकीदार ठेवण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. असे केल्यास ते ठिकाण सुरक्षित राहील.
दिवस उजाडताच माकडांचा उद्पव्याप सुरू होतो. त्यामुळे नागरिकांना हातचे काम सोडून त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी धावाधाव करावी लागते. त्यातच नागरिकांचा वेळ जात आहे. विशेषत: महिला व बालकांना धोका निर्माण झाला असून देलनवाडी वॉर्डात या माकडांना त्यांच्यावर हमला करण्याइतपत मजल माकडांनी देलनवाडी वार्डात केली आहे. पुढे माकडांना घाबरून एखादी अनुचीत घटना घडू शकते. त्यामुळे ब्रह्मपुरीकर सध्या धास्तावले आहे. वनविभागाचे डझनभर कर्मचारी या कामांवर काही दिवस नियुक्ती केल्यास त्यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा देऊ शकतात पण मनात अद्यापही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हा प्रश्न गांभीर्याने आला नसल्याने सदर बाब वेळोवेळी नागरिकांनी आणून दिली असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. एखादी अनुचीत घटना घडण्यापूर्वीच वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा वनविभागाच्या विरोधात नागरिकांचा तिव्र संतापाचा भडका होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)