वेकोलि भरतीसाठी नागपुरातील मुख्य प्रबंधक कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:46+5:302021-01-08T05:33:46+5:30
चंद्रपूर : वेकोलिअंतर्गत खाण सरदार पदाच्या २२८ जागा भरण्यासाठी मंजुरी मिळाली. मात्र या जागांसह सर्वसाधारण पदाची भरती प्रक्रियाही राबवीत ...
चंद्रपूर : वेकोलिअंतर्गत खाण सरदार पदाच्या २२८ जागा भरण्यासाठी मंजुरी मिळाली. मात्र या जागांसह सर्वसाधारण पदाची भरती प्रक्रियाही राबवीत मायनिंगचे प्रशिक्षण घेऊन नुकतेच उत्तीर्ण झालेल्यांसाठीही जागा काढाव्यात, या मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडने वेकोलिच्या नागपूर येथील मुख्य प्रबंधक कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला.
नागपूर वेकोलि विभागात अनेक कोळशाच्या खाणी आहेत. मात्र, स्थानिक युवकांना अपेक्षित रोजगार उपलब्ध झाला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कोळसा खाणी बंद पडल्या. त्यामुळे युवकांचा रोजगार बुडाला आहे. वेकोलि प्रशासनाकडून २०१८ पासून मायनिंगमध्ये पास झालेल्यांसाठी भरती प्रक्रिया राबविली नाही. परिणामी, मायनिंग अभ्यासक्रमामध्ये पास झालेले हजारो युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची वयोमर्यादा वाढत आहे. त्यातच परराज्यात भरती प्रक्रिया राबवून युवकांना येथे नियुक्ती करण्याचा कट वेकोलिने रचल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. चंद्रपुरातील कोळसा खाणींमुळे नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. वेकोलिने मायनिंग सरदार पदाच्या २२८ जागा काढण्यास मंजुरी दिली आहे. मात्र या जागा खात्यांतर्गत भरणार असल्याने मायनिंगचे प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण युवकांचे काय, असा प्रश्न आमदार जोरगेवार यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला. नागपूर वेकोलि प्रबंधक कार्यालयाचे इगबाल सिंग यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, पंकज गुप्ता, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, करणसिंह बैस, तिरुपती कलगुरुवार, सलीम शेख, राशेद हुसेन, जितेश कुळमेथे, विश्वजित शाहा, हरमन जोसेफ, तापोश डे, प्रतीक शिवणकर, नकुल वासमवार, गौरव जोरगेवार, बबलू मेश्राम, राहुल मोहुर्ले, दीपक पद्मगीरवार, पंकज चिमूरकर यांच्यासह मायनिंग सरदार उपस्थित होते.