वरोऱ्याच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: June 14, 2016 12:32 AM2016-06-14T00:32:03+5:302016-06-14T00:32:03+5:30
भद्रावती व वरोरा तालुक्यातील वीज ग्राहकांना मागील काही महिन्यांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
बाळू धानोरकर यांचे नेतृत्व : सात दिवसांचा अल्टीमेटम
वरोरा : भद्रावती व वरोरा तालुक्यातील वीज ग्राहकांना मागील काही महिन्यांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वीज वितरण कंपनी वीज ग्राहकांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत वीज ग्राहकांच्या समस्या त्वरीत सोडविण्याच्या मागणीकरिता सोमवारी वरोरा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मागण्या सात दिवसात निकाली काढल्या नाही तर पूर्वसूचनेविना पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
वरोरा व भद्रावती तालुक्यातील मेंटन्सची कामे जून महिना सुरू होवूनही वीज वितरण कंपनीकडून पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने वरोरा व भद्रावती तालुक्यातील वीज ग्राहकांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वीज कार्यालयातील अनेकांची कामे प्रलंबीत आहे. अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिक आपल्या समस्या सोडवू शकत नाही.
वरोरा व भद्रावती शहरातील वीज लाईन भूमिगत करण्यात यावी, वाकलेले वीजेचे खांब सरळ करण्यात यावे, नादुरुस्त ट्रान्सफार्मर त्वरीत बदलविण्यात यावे, वीज पुरवठा घेताना ग्रामपंचायत व नगर पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतर १०० रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर अटी असलेले जोडण्याची सक्ती केली जाते, ती सक्ती बंद करावी, आदी मागण्या मोर्चादरम्यान करण्यात आल्या. कार्यकारी अभियंता नगराळे यांनी निवेदन स्वीकारले.
(तालुका प्रतिनिधी)
वीज पुरवठा सुरू करण्यासाठी कोठारी येथे गावकऱ्यांचा ‘राडा’
कोठारी : मागील १० महिन्यापासून गावातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्या. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून नियमित वीज पुरवठा करण्याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तरीही कोठारीतील विजेचा लपंडाव नियमित होता. अशात सतत दोन दिवस कुठलेही ठोस कारण नसताना वीज बेपत्ता झाली. त्यामुळे लोकांच्या संयमाचा बांध फुटला व ६ जूनच्या रात्री १० वाजता वीज खंडीत झाल्याबरोबर लोकांनी वीज वितरण कार्यालयाकडे धाव घेतली. वीज कर्मचाऱ्यांच्या गचाळ कारभाराचा जाब विचारत दोन तास वाहतूक ठप्प करून टायर जाळून निषेध नोंदविला व राडा घातला. कोठारी येथील वीज वितरण कंपनीच्या शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर व शाखा अभियंत्यावर कुणाचाही वचक नाही. कोणताही कर्मचारी व अभियंता मुख्यालयाला राहत नाही. कुणाचे कोणत्याही कामावर नियंत्रण नाही. केवळ १० ते १५ कर्मचारी पगारासाठी वीज कार्यालयात दाखल होतात. मात्र गावातील समस्या निस्तारण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. असे कर्मचारी समवेत अभियंता वीज समस्या निर्माण झाल्यानंतर दुरूस्ती करण्याचे कारण पुढे करून येनबोडी येथे पार्टीत गुंग असतात. वीज पुरवठ्यासाठी गावकरी आक्रोश करीत असताना कर्मचारी मात्र पार्टीचा आनंद घेत असतात. ३३ के.व्ही. उपकेंद्रातील कर्मचारी व आॅपरेटरचा कामाबाबत कधीही आस्था दाखवित नाहीत. मात्र कार्यालयाच्या मागे व आॅपरेटर रूमच्या मागे दारूच्या बाटल्यांचा खच्च पडून आहे. त्यावरून वीज कर्मचारी कुठे गुंग असतात व नेमून दिलेल्या कामात किती तत्पर असतात हे दिसून येते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे किती लक्ष केंद्रीत आहे किंवा ते कर्मचाऱ्यांच्या पार्टीत सहभागी होतात, असा संशय आहे. (वार्ताहर)