मृतदेह घेऊन टोल नाक्यावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:20+5:302020-12-24T04:26:20+5:30
विसापूर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेल्या विसापूर टोल नाक्यावर शिवसेनेने मंगळवारी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दीपक येनूरकर(५५ रा. विसापूर) यांच्या मृतदेहासह ...
विसापूर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेल्या विसापूर टोल नाक्यावर शिवसेनेने मंगळवारी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दीपक येनूरकर(५५ रा. विसापूर) यांच्या मृतदेहासह मोर्चा काढून नुकसान भरपाईची मागणी केली.
विसापूर येथील टोल नाक्यापासून शंभर मीटर अंतरावर चुनाभट्टी परिसरजवळ दीपक येनुरकर या इसमाचा दुचाकीने (एम एच ३४ बी यु ६४८३ ) सायंकाळी ७-३० वाजता कामावरून येत असताना ट्रकसोबत अपघात झाला. त्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला व गावकरी व शिवसेनेच्या वतीने टोलधारकांना घटनेसाठी जबाबदार धरून बुधवारी दूपारी २ वाजता अपघातग्रस्त इसमाच्या मृतदेहासह मोर्चा काढण्यात आला व नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली. यापूर्वीही टोल विभागाला परिसरातील पथदिवे, रुग्णवाहिका अद्यावत ठेवण्याबाबत शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. शिवाय लोकमतनेसुद्धा यापूर्वी प्रसाधनगृह पथदिवे बंद असल्याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. या बाबीकडे टोल प्रशासनही दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडली आहे, अशी माहिती शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व चंद्रपूर जिल्हा युवासेना उपप्रमुख प्रदीप गेडाम यांनी दिली. दरम्यान बल्लारपूर पोलीस प्रशासनाने टोल नाक्यावर येऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.