मंगळवार ठरला ‘मोर्चा’ वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:34 PM2019-02-12T22:34:18+5:302019-02-12T22:35:00+5:30
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांनी विविध प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी चंद्रपुरात महाराष्ट्र राज्य किसान सभा, पोंभुर्णा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि चिमूर येथे वन विभागाच्या अन्यायाविरूद्ध नागरिकांची मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांनी विविध प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी चंद्रपुरात महाराष्ट्र राज्य किसान सभा, पोंभुर्णा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि चिमूर येथे वन विभागाच्या अन्यायाविरूद्ध नागरिकांची मोर्चा काढला. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांची दाहकता वाढत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे, असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. दरम्यान, सरकारविरूद्ध घोषणा देऊन शहर दणाणून सोडले. समस्या सोडविल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही मोर्चेकºयांनी दिला आहे.
शेत जमिनीचे पट्टे द्या
चंद्रपूर : शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सर्व जबरान जोतधारकांना शेतजमीन व घराचे पट्टे वाटप करून वैयक्तिक सातबारा द्यावा, वनहक्क अधिकार कायद्यात गैरआदिवासींकरिता असलेल्या तीन पिढ्यांची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने आझाद बगिचापासून मोर्चा काढला. हा मोर्चा जटपुरा गेटजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी अडविले. त्यामुळे तब्बल अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रशासनाने मोर्चेकºयांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे १९ मागण्यांचे निवेदन सादर केले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना ५० लाखांची मदत द्यावी, ६० वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर व असंघटीत कामगारांना मासिक ४ हजार रूपये पेंशन देण्याचा कायदा करावा, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, पिकविमा योजनेचा वापर कंपन्यांऐवजी शेतकरी हितासाठी करावा, शेतकºयांना विमा भरपाई द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता. मोर्चेकºयांच्या वतीने किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ. महेश कोपूलवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ. महेश कोपूलवार, जिल्हाध्यक्ष संतोष दास, राज्य महासचिव प्रा. नामदेव कन्नाके, राज्य सदस्य विनोद झोडगे, सुधाकर महाडोेरे प्रदीप बोबडे, गणेश हाके, प्रमोद गोडघाटे, कवडू येनप्रेड्डीवार, मिलिंद भन्नारे, रूद्राभाऊ कुचनकार आदी उपस्थित होते
चार दिवसात संघटनेची बैठक घेऊ- सुधीर मुनंटीवार
जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्त व असंघटीत कामगारांच्या मागण्यांची जाणीव आहे. या समस्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी येत्या चार दिवसांत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावू. प्रलंबित समस्या सोडविण्यासोबतच कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन सदैव कटीबद्ध आहे. प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत, अशी ग्वाही मोर्चाच्या शिष्टमंडळ प्रमुखांशी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आदिवासी गावांना पेसा लागू करा
पोंभुर्णा : गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष मनोज आत्राम, गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष धीरज शेडमाके, तालुका अध्यक्ष जगन येलके यांनी केले. शिष्टमंडळाने नायब तहसीलदार गिरीधर रणदिवे यांना समस्यांचे निवेदन दिले. ५० टक्के आदिवासी बहुल गावांना ५ व ६ व्या अनुसूचिअंतर्गत पेसा कायदा लागू करावा, पोंभुर्णा येथील इको पार्कला शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे नाव द्यावे, प्रत्येक गावात गोटूल उभारावे, तालुक्यातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा द्यावी, जबरानजोत धारकांना पट्टे द्यावे, आदिवासी सुवर्ण जयंती शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना द्यावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
संघरामगिरी रक्षणार्थ एकवटले बौद्धबांधव
चिमूर : वन विभागाच्या विरोधात भन्ते ज्ञानज्योती महास्थविर व भिक्खु संघाच्या नेतृत्वात बौद्ध बांधवांनी मंगळवारी दुपारी १२.३० वाजता तक्षशिला बौद्ध विहारापासून उपविभागीय कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढला.
तपोवन बुद्धविहार महाप्रज्ञा साधना भूमी संघारामगिरी (रामदेगी) येथे मागील ४५ वर्षांपासून बौद्ध धम्माचे प्रसार केंद्र्र बनले आहे. संघारामगिरी बौद्ध संस्कृतीची पावन भूमी असल्याने देश-विदेशातील हजारो अनुयायी दर्शन घेतात. मात्र ताडोबा बफर झोनमध्ये हे स्थळ येत असल्याच्या कारणावरून वन विभागाने नोटीस बजावली. धम्म समारोहाला परवानगी देण्यास टाळाटाळ व विहार परिसरातील साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न अधिकाºयांनी केला. यामुळे भिक्खु संघ व नागरिकांत अंसतोष निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तक्षशिला बौद्ध विहार चिमूर येथून महामूक मोर्चाला सुरवात झाली. मोर्चा पंचशील चौक, चावडी मोहल्ला, मार्केट लाईन, शिवाजी चौक, शहीद बालाजी रायपूरकर चौक, नेहरू चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सिक्कीमचे माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या पत्नी डॉ. कमलाताई गवई, पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, भारिपचे कुशल मेश्राम, वनहक्क समितीचे अध्यक्ष रामकृष्ण वाघ आदींनी प्रशासनाचा निषेध केला. मागण्यांचे निवेदन एसडीओ बेहरे यांनी दिले. मोर्चात नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील हजारो धम्मबांधव सहभागी झाले होते.