बरे होणाऱ्यांपेक्षा कोरोना बाधितांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 05:00 AM2021-03-11T05:00:00+5:302021-03-11T05:00:36+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातही उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या ६९९ ॲक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत २ लाख २५ हजार ८१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ९९ हजार २७८ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील २४ तासामध्ये ६३ नव्या रुग्णांची भर पडली असून केवळ २७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २४ हजार ३८५ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर २३ हजार २८५ जण कोरोनातून बरे झाले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, शेजारील यवतमाळ, वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे तेथील प्रशासनाने सक्त पाऊल उचलले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या ६९९ ॲक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत २ लाख २५ हजार ८१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ९९ हजार २७८ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
चित्ररथांद्वारे जनजागृती
जिल्ह्यात कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.जिल्ह्याच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या डिजिटल चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती व सुरक्षित कोविड लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांच्या संकल्पनेतून या प्रचार अभियानाची सुरुवात झाली आहे. डिजिटल चित्ररथासोबत योजनांची माहिती देणारे प्रचार साहित्य देखील वितरित केले जाणार आहे. दरम्यान, समाज कल्याण विभागाच्यावतीनेही विविध योजनांची माहितीसाठी चित्ररखाद्वारे्ा माहिती देण्यात येणार आहे.
सुरक्षित अंतर राखा- जिल्हाधिकारी
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखा तसेच त्रिसुत्रीचा वापर प्रत्येक नागरिकांनी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नागरिकांना केले आहे.