ग्रामीण भागात शौचालयापेक्षा मोबाईलला जास्त महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:40 AM2019-05-09T11:40:01+5:302019-05-09T11:40:25+5:30
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पण काही भागातील ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पण काही भागातील ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे. आजही ग्रामीण भागातील काही कुटूंब शौचालयाला कमी आणि मोबाईलला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे.
हातात झाडू घेवून पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छतेचा मंत्र दिला, पण प्रशासनातीलकाही अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शासकीय योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे पोहोचलीच नसल्याची जिल्ह्यात स्थिती आहे. परिणामी, या भागात राहणारी गरीब जनता स्वच्छतेच्या योजनेपासून दूर आहे. शौचालयाकरिता संचित रक्कम खर्च करण्याऐवजी त्या रकमेतून मोबाईल खरेदी करण्याकडे तरुण पिढीचा कल अधिक आहे. विज्ञान युगात प्रत्येक कुटुंबातील मोबाईल फोन असणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येक कुटुंबात शौचालय असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे घेवून जाण्यासाठी राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. २०१३ पासून हागणदारी मुक्त संकल्पना पुढे आली. ग्रामीण परिसरातील बºयाच गावातील कुटुंबात शौचालय नसल्याने निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून गावोगावी शौचालय बांधण्यात आली. शौचालयाचा वापर वाढल्याने गावात स्वच्छता दिसत होती. बारा निकषांच्या आधारावर निर्मल गावांची निवड झाली. निवड झालेल्या गावांना पुरस्कार मिळाले व विशेष निधी दिला गेला, पण त्या गावांना स्वच्छता टिकवून ठेवण्यात पाहिजे तसे यश आले नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक कुटुंबात शौचालय असावे, त्याचा वापर नियमित व्हावा म्हणून जनजागृती करण्याची गरज आहे.
रस्त्याच्या कडेलाच उरकला जातो प्रात:विधी
ग्रामीण भागात काहींनी शौचालय बांधले असले तरी त्याचा वापर न करता त्यात शेतीची अवजारे, सरपण ठेवले जात आहे. गावाच्या मुख्य मार्गाच्या कडेलाच ग्रामस्थ शौचास बसतात, घरी शौचालय असताना नागरिक त्याचा वापर न करता रस्त्यावर घाण करीत असल्याने गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोबाईल व शौचालयाची मोजणी केल्यास मोबाईल फोन अधिक आढळून येतात. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर शासनाने दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले असले, तरी ते सध्या कागदावरच असल्याने या योजनेला हरताळ फासल्या जात आहे.