मच्छरदाणी लाभार्थींना वाटप न करता दुकानात विकली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:11+5:302021-09-21T04:31:11+5:30
जिवती: तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पल्लेझरी येथे आरोग्य सेवक किन्नाके यांनी ...
जिवती: तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पल्लेझरी येथे आरोग्य सेवक किन्नाके यांनी यादीनुसार ३१३ व्यक्तींना मच्छरदाणी वाटप करायची होती. मात्र, २५ लोकांनाच मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. उर्वरित मच्छरदाणी खासगी कापड दुकानात विकल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुका महिला संघटिका सिंधुताई जाधव यांनी केला होता.
मच्छरदाणी वाटपात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी सिंधुताई जाधव यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी तक्रार केली आहे. वरिष्ठांकडे तक्रार दिल्यावरून संबंधित आरोग्य सेवकाने आपल्याला दिनांक १९ सप्टेंबरच्या रात्री १० वाजून ०९ मिनिटांनी फोन करून खालच्या भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप शिवसेना महिला तालुका संघटिका सिंधुताई जाधव यांनी केला आहे. याबाबत जाधव यांनी संबंधित आरोग्य सेवकाला निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.