रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:58 PM2017-09-11T23:58:35+5:302017-09-11T23:59:06+5:30

चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उणिवा दाखविणारी वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Most of the doctors in the hospital's private practice | रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिस

रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिस

googlenewsNext
ठळक मुद्दे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उणिवा दाखविणारी वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यादरम्यान माहिती घेताना एकापेक्षा एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सामान्य रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस सुरू आहे. येथील काही डॉक्टर तर सामान्य रुग्णालयात रुग्णांना आपल्याच क्लिनिकमध्ये रेफर करीत असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांची कशी गैरसोय होते, याविषयीचे सचित्र वृत्त लोकमत सातत्याने प्रकाशित करून लक्ष वेधत आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणाही अ‍ॅलर्ट झाली असून सावरासावरीचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. मात्र रुग्णांची होणारी गैरसोय आजही तशीच कायम असल्याचे लोकमतच्या पाहणीत दिसून आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात बालरोग, स्त्रीरोग, त्वचा रोग, अस्थी रोग, दंतरोग, नेत्र रोग आदींसाठी स्वतंत्र विभाग आहेत. या विभागात त्या त्या विषयाचे संबंधित तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. यातील काही डॉक्टर आपल्या कर्तव्यावर राहून मनोभावे रुग्णांची सेवा करताना दिसतात. मात्र बहुतांश डॉक्टरांनी स्वत:चे खासगी दवाखाने थाटले आहेत. त्यांची तिथेही दोन पाळ्यात धडाक्यात प्रॅक्टीस सुरू आहे. यामुळे दररोज सामान्य रुग्णालयात हजारोंच्या संख्येत येणाºया गोरगरीब रुग्णांना येथील डॉक्टर पुरेसा वेळ देऊ शकत नाही.
वास्तविक येथे कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांना शासनाकडून समाधानकारक वेतन दिले जाते. विशेष म्हणजे, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या ७ आॅगस्ट २०१२ च्या शासनपरिपत्रकानुसार शासकीय रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांना व्यवसायविरोध भत्ता दिला जातो. जिल्हा सामान्य रुग्णालयील काही डॉक्टर्स आणि ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारीदेखील या भत्त्याची उचल करतात. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टीस करू नये, यासाठी हा भत्ता दिला जातो. मात्र काही डॉक्टर हा भत्ता उचलतात आणि त्यांची प्रॅक्टीसही सुरू असल्याची माहिती आहे.
बालमृत्यूचा दर कमीच -डॉ. एम. जे. खान
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य ठिकाणावरुनही प्रसूतीसाठी महिन्याला किमान एक हजार रुग्ण दाखल होतात. यापैकी १२५ ते १५० शिशुमध्ये गर्भातील काही गंभीर आजार असतात. यामध्ये बाळ कमी दिवसाचे असणे, कमी वजनाचे असणे, आईच्या गर्भामध्ये जन्मापूर्वीच बाळाकडून विष्ठा सोडली जाणे, आॅक्सिजनचा कमी पुरवठा असणे, हृदय किंवा अन्य अवयवांची पुरेशी वाढ नसणे आदींचा समावेश असतो. प्रसुतिमध्ये हजार बालकांमध्ये अशा प्रकारच्या गंभीर आजाराची १० ते १५ टक्के शक्यता कायम असते. याशिवाय या बालकांना दवाखान्यात पोहचण्यापर्यंत अनेक वेळा गंभीर आजारांची लागण होते. जवळपास एक हजारामध्ये २५० ते ३०० बालकांना अतिदक्षता विभागात ठेवावेच लागते. त्यामुळे हजार बालकांच्या मागे किमान २५० ते ३०० नवजात शिशूंना प्रसुतिपूर्वी व प्रसुतीनंतर धोका असतो. आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या मार्फत ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, असे स्पष्टीकरण सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. खान यांनी लोकमतला दिले आहे.
पालकमंत्र्यांकडून दखल
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंंदीवर ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू केलेली आहे. यामध्ये रुग्णालयातील धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. याची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेतली. त्यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांना मुंबईला बोलावून बैठक घेतले.
जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा -काँग्रेस
चंद्रपूर : सामान्य रुग्णालयात सक्षम यंत्रणेच्या अभावामुळे रुग्णांची कशी गैरसोय होते, याकडे लक्ष वेधणारी वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित केली. याची दखल घेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर सचिव महेश मेंढे यांच्या नेतृत्वात काँग्रेसजणांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देत रुग्णालयातील संपूर्ण कारभाराची जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेत एका समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयाच्या प्रसुती विभागात तीन महिन्यात ८० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. अतिदक्षता विभागात पायाभुत सुविधांचा अभाव आहे. या विभागात काही यंत्र हाताळणारे प्रशिक्षित नाही. रुग्णालयात कमी खाटा असल्यामुळे रुग्णांना जमिनीवर बसून उपचार घ्यावा लागतो. चंद्रपूरला मेडीकल कॉलेज होऊन तीन वर्ष होत आहेत. त्यानुसार रुग्णांना सुविधा पुरविण्यात याव्या. या सर्व समस्यांचा तत्काळ निपटारा करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. निवेदन देताना काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विनोद दत्तात्रेय, शिवा राव, रोशन रामटेके, सी. रेमन्ड, अनिल नरुले, अरविंद मडावी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Most of the doctors in the hospital's private practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.