ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक वाघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:59 PM2019-02-11T22:59:36+5:302019-02-11T22:59:56+5:30

सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी गावशिवाराकडे कूच करीत आहेत. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे.

Most tigers die in Brahmapuri forest section | ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक वाघांचा मृत्यू

ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक वाघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देआठ वर्षातील आकडेवारी : विविध कारणांनी २२ वाघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी गावशिवाराकडे कूच करीत आहेत. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे. मागील आठ वर्षांचा अभ्यास केला तर चंद्रपूर, मध्यचांदा वनविभागाच्या तुलनेत ब्रह्मपुरी वनविभागात हा संघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसते. या क्षेत्रात आठ वर्षात सुमारे ३० जणांचा बळी गेला आहे. एवढेच नाही तर २२ वाघ आणि २७ बिबट्यांचाही या क्षेत्रात मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर हा जिल्हा खनिज संपत्तीने नटलेला आहे. कोळसा, सिमेंट खाणी, आयुधनिर्माणी कारखाना व आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र या जिल्ह्यात असल्याने चंद्रपूर जिल्हा देशात सुपरिचित आहे. असे असले तरी अलिकडच्या काळात चंद्रपूर वाघांचा जिल्हा म्हणून देशभर ओळखला जातो. त्याचे कारणही तसेच आहे. अलिकडच्या काळात जिल्ह्यात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यासोबतच बिबट्यांचीही संख्या वाढली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजनानासाठी पोषक असल्याने हे शक्य होत आहे. असे असले तरी जंगल मात्र तेवढेच; किंबहुना त्यापेक्षा कमी होत असल्याने वाघासाठी जंगलातील अधिवास कमी होत आहे. प्रत्येक वाघाचे एक वेगळे क्षेत्र असते. या क्षेत्रात दुसºया वाघाचा वावर तो खपवून घेत नाही. या प्रकारामुळे वाघाचा मागील काही वर्षात मानवी वस्तीकडे वावर वाढू लागला आहे. गावशिवारात वाघाचे दर्शन होत आहे. पाळीव प्राणी आणि वन्यप्राण्यांवरही हल्ले होत आहे. चंद्रपूर वनविभाग, मध्यचांदा वनविभाग व ब्रह्मपुरी वनविभागात मोठ्या प्रमाणावर वाघ, बिबट्यांचे मानवांवर हल्ले झाले आहेत. यातील ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक व्याघ्र हल्ले घडून आले आहेत. या क्षेत्रात मागील आठ वर्षात ३० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याशिवाय शेकडो पाळीव प्राण्यांनाही वाघ व बिबट्याने ठार केले आहेत. विशेष म्हणजे, एकट्या ब्रह्मपुरी वनविभागात मागील आठ वर्षात तब्बल २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात २०१० मध्ये एक, २०११ मध्ये तीन, २०१२ मध्ये एक, २०१३ मध्ये एक, २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये चार, २०१७ मध्ये तीन, २०१८ मध्ये सहा वाघांचा मृत्यू झाला आहे.
२७ बिबट्यांचाही मृत्यू
ब्रह्मपुरी वनविभागात वाघांसोबत बिबट्यांचीही संख्या अलिकडे वाढली आहे. मात्र जंगल परिसर कमी होत असल्याने व गावशिवारात झुडुपी जंगल वाढत असल्याने बिबट्याचाही मानवी हद्दीत वावर वाढला आहे. ब्रह्मपुरी वनविभागात मागील आठ वर्षात तब्बल २७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात २०१० मध्ये दोन, २०११ मध्ये चार, २०१२ मध्ये चार, २०१३ मध्ये एक, २०१४ मध्ये दोन, २०१५ मध्ये एक, २०१६ मध्ये पाच, २०१७ मध्ये तीन, २०१८ मध्ये पाच बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Most tigers die in Brahmapuri forest section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.