पोरक्या वासराला तिने दिले मातृत्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:28 PM2017-10-12T13:28:59+5:302017-10-12T13:30:34+5:30
गायीने एका वासराला जन्म दिला आणि जन्म देताच तिचा मृत्यू झाला. तिचे अभागे वासरू जन्मताच आईविना पोरके झाले. पण, एका दुसºया गायीने त्या वासराला जवळ केले आणि तिने त्याला मातृत्वाची उब दिली. ती त्याला आपल्या पोटच्या पोटाप्रमाणे दुध देते, त्याला जिभेने चाटून आईचे प्रेम आणि वात्सल्य देते.
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : गायीने एका वासराला जन्म दिला आणि जन्म देताच तिचा मृत्यू झाला. तिचे अभागे वासरू जन्मताच आईविना पोरके झाले. पण, एका दुसºया गायीने त्या वासराला जवळ केले आणि तिने त्याला मातृत्वाची उब दिली. ती त्याला आपल्या पोटच्या पोटाप्रमाणे दुध देते, त्याला जिभेने चाटून आईचे प्रेम आणि वात्सल्य देते.
ही कथा आहे गावठी एक महिन्याचे वासरू व त्याला प्रेम देणाºया जर्सी जातीच्या गायीची! त्याचे झाले असे, मोकाट जनावर म्हणून बल्लारपूर नगर परिषदेच्या कांजी हाऊसच्या कर्मचाºयांनी गाभण असलेल्या देशी गायीला कांजीत कोंडले. या कांजीत त्या गायीची प्रकृती बिघडली आणि त्याच अवस्थेत एका वासराला जन्म देऊन ती लगेचच मरण पावली. नगर परिषद कर्मचाºयांनी त्या गायीची सद्गति केली. आता उरला प्रश्न, त्या वासराचे करायचे काय? त्याला कुठे ठेवायचे आणि पोसायचे कुणी? असा पेच निर्माण झाल्यावर त्यावर तोडगा निघाला. येथील किल्ला वॉर्डातील, वर्धा नदी काठावर शेती असलेले आणि दुग्ध व्यवसाय करणारे राजकुमार शर्मा यांच्याकडे ते वासरू आणून न.प. कर्मचाºयांनी दिले. शर्मा यांच्याकडे गायी व म्हशी अशी दुभती जनावरे खूप आहेत. त्यातील एक महिन्याचे वासरू असलेल्या दुभत्या जर्सी जातीच्या गायीजवळ त्या वासराला दूध प्यायला नेले. परंतु परका म्हणून गायीने त्या वासराला झिडकारले. तरीही, प्रयत्न म्हणून शर्मा यांनी परत वासराला दोन तिनदा तिच्याकडे नेले आणि तिसºया खेपेला त्या गायीने वासराला आपल्याजवळ करून त्याला आपले दूध दिले व जिभेने त्याला चाटून ममत्त्वाने प्रेमही दिले. पोटच्या लेकराप्रमाणे ती त्याला आता रोज दूध देते.
त्याला चाटून त्याची ती आपल्या पद्धतीने खबरबात घेते. तो दिसला नाही की, ती त्याच्याकरिता हंबरतेही! तिचे स्वत:चे दोन महिन्यांचे वासरू आहे. या परक्या एक महिन्याच्या वासरावरही तिचा तेवढाच जीव जडला आहे. ही गाय लाल रंगाची, तिचे स्वत:चे वासरूही त्याच रंगाचे! ते अभागे वासरू पांढºया रंगाचे! गाय जर्सी, ते वासरू गावठी. जात वेगळी, रंग वेगळा! तरीही, दोघांमध्ये भरपूर ममत्व! प्राण्यामध्येही परोपरकाराची भावना असते, हेच यावरून आढळते.