आईची माया! किडनी दान करून विवाहित मुलीला दिले जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:09 AM2023-10-18T11:09:35+5:302023-10-18T11:10:09+5:30

सावरगाव येथील सुखद घटना : डॉक्टरांकडून यशस्वी प्रत्यार्पण; सीमा शेटीये यांच्या मातृत्वाचे सर्वत्र कौतुक

Mother gave life to a married girl by donating a kidney | आईची माया! किडनी दान करून विवाहित मुलीला दिले जीवनदान

आईची माया! किडनी दान करून विवाहित मुलीला दिले जीवनदान

राजेश बारसागडे

सावरगाव (चंद्रपूर) : आई आपल्या अपत्याबाबत स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नाही. म्हणूनच ‘आईचे हृदय हे, नुसते हृदय नव्हे तर प्रेमाने भरलेला अथांग सागर असते,’ असे कवितेत म्हटले जाते. याचा सुखद प्रत्यय नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे आला. आईने किडनी देऊन आपल्या विवाहित मुलीला जीवनदान दिल्याने नातेवाइकांसह गावात सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वतःची एक किडनी मुलीला दान देणाऱ्या मातेचे नाव सीमा किशोर शेटीये (५०) तर जीवनदान मिळालेल्या मुलीचे नाव अश्विनी निमिश गौचंद्रा (३०, बालाघाट, मध्य प्रदेश) असे आहे. सीमा शेटीये यांच्या कुटुंबात पती, दोन मुले व दोन मुली आहेत. मोठी मुलगी अश्विनीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट येथे ती सुखाने संसार करीत होती. मात्र, अश्विनीच्या दोन्ही किडन्या अचानक निकामी झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून पुढे आले. तिची प्रकृती खालावत गेली. प्रत्यार्पणासाठी किडनी मिळत नव्हती. शेवटी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आई सीमा शेटीये यांनी स्वतःची एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले. आईच्या त्यागामुळे मुलीला जीवनदान मिळाले.

दोघींचीही प्रकृती उत्तम

मुले-मुली शिकून मोठी झाली की काही जण जन्मदात्यांना कमी लेखतात. त्यांना वाऱ्यावर सोडून देतात तर कधी वृद्धाश्रमात ठेवतात. मात्र आई-वडिलांचे आपल्या अपत्यांबद्दलचे प्रेम कधी आटत नाही. स्वतःच्या जीवापेक्षा मुलांच्या जीवाचे हित जोपासतात. सीमा शेटीये यांच्या त्यागाचे हे उत्तम उदाहरण आहे. मुला-मुलींनी यातून प्रेरणा घ्यावी व आई-वडिलांच्या प्रेमाला समजून घ्यायला हवे. सध्या दोघींचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती कुटुंबाने दिली.

Web Title: Mother gave life to a married girl by donating a kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.