मातृसन्मान हाच सर्वोच्च सन्मान
By admin | Published: January 8, 2015 10:52 PM2015-01-08T22:52:56+5:302015-01-08T22:52:56+5:30
हल्ली पुरस्कार कसे मिळविले जातात. हे सर्वविदीतच आहे. मात्र लोकसेवा आणि विकास संस्था पुरस्कारासाठी कुणाचाही अर्ज मागवित नाही. नि:स्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्यांची संस्था दखल घेवुन
चंद्रपूर : हल्ली पुरस्कार कसे मिळविले जातात. हे सर्वविदीतच आहे. मात्र लोकसेवा आणि विकास संस्था पुरस्कारासाठी कुणाचाही अर्ज मागवित नाही. नि:स्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्यांची संस्था दखल घेवुन त्यांचा गौरव करते. मातृसन्मान हाच सर्वोच्च सन्मान असून अशा प्रेरणादायी मातृशक्तीच्या मागे संस्था सदैव उभी राहील, असे प्रतिपादन लोकसेवा आणि विकास संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी व्यक्त केले आहे.
लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूर या संस्थेद्वारा आयोजित मातृगौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कोसारा मार्गावरील इंस्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या मातृशक्तीचा गौरव करण्यात आला. शांताराम पोटदुखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कार्यकारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, उज्वला कुळकर्णी, सत्कारमूर्ती डॉ. एस. राजलक्ष्मी, प्रा. डॉ. शशी अग्रवाल आणि उषा बुक्कावार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्रेया सर्जेकर आणि चमुने शारदास्तवन तथा स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमात महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते यावर्षीच्या सुशिलाबाई दीक्षित स्मृति पुरस्काराने डॉ. एस. राजलक्ष्मी, स्व. यशवंतराव कुळकर्णी स्मृति मातृगौरव पुरस्काराने प्रा. डॉ. शशी अग्रवाल आणि स्व. भावना जयस्वाल स्मृति पुरस्कार उषा बुक्कावार यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. एस. राजलक्ष्मी, प्रा. डॉ. शशी अग्रवाल आणि उषा बुक्कावार यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेने गौरव केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी दीपक जयस्वाल, डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, महापौर राखी कंचर्लावार, शांताराम पोटदुखे यांनीही विचार व्यक्त केले. संचालन प्रा. डॉ. अल्का तामगडे यांनी तर आभार डॉ. जे.एन. चक्रवर्ती यांनी मानले. (प्रतिनिधी)