अन् मुलगी झाली ‘आईची आई’ !

By Admin | Published: October 26, 2014 10:37 PM2014-10-26T22:37:17+5:302014-10-26T22:37:17+5:30

‘त्या’ आईने आपल्या बाळावर जिवापाड प्रेम केलं. काळजी घेतली. तिला लहानाचं मोठं केलं. अठराविश्व दारिद्र्य असल्याने दु:खही भोगले. आज ही आई १०२ वर्षाची झाली आहे. ना चालता येतं, ना स्पष्ट दिसतं,

Mother got mother! | अन् मुलगी झाली ‘आईची आई’ !

अन् मुलगी झाली ‘आईची आई’ !

googlenewsNext

ममतेची महतीच मोठी : कोकेवाडा येथील मायलेकींचं कुटुंब
सचिन सरपटवार - भद्रावती
‘त्या’ आईने आपल्या बाळावर जिवापाड प्रेम केलं. काळजी घेतली. तिला लहानाचं मोठं केलं. अठराविश्व दारिद्र्य असल्याने दु:खही भोगले. आज ही आई १०२ वर्षाची झाली आहे. ना चालता येतं, ना स्पष्ट दिसतं, ना ऐकायला येतं ! खाटेवरच तिचा दिवस उगवतो अन् खाटेवरच रात्रही होते. आता या आईची मुलगीही मोठी झाली. तिचे लग्नही झाले. म्हाताऱ्या आईची काळजी घ्यायला कुणी नाही म्हणून घरजावई घरात आणला. पण तोही सोडून गेला. मुलगी मात्र आईच्या सेवेसाठी तिथेच राहिली. आई जशी आपल्या लहान मुलाची काळजी घेते, तशीच काळजी ही मुलगी आपल्या आईची घेत आहे. आपलं संपूर्ण तारुण्य आईच्या सेवेत घालवत ती मुलगी आपल्या आईची ‘आई’ झाली आहे. भद्रावती तालुक्यातील कोकेवाडा (तु.) या गावात या मायलेकींचे वास्तव्य आहे.
सखुबाई लक्ष्मण तुराणकर हे म्हाताऱ्या आईच नाव. सखुबाईनी आज वयाची शंभरी पार केली. गावातील लोकांचे कपडे धुवून त्या आपला उदरनिर्वाह करीत होत्या. त्यांना तीन मुली. दिवसभर काबाडकष्ट करून सखुबार्इंनी तिनही मुलींचे लग्न केले. लग्न झाल्यावर आईची काळजी घ्यायला कुणीही नाही हे पाहून तिसऱ्या क्रमांकाची मुलगी अनुसया हिच्यासाठी घरजावई शोधण्यात आला. या तिसऱ्या मुलीचे नाव अनुसया भोसकर (६०) आहे. ती सध्या आपल्या आईची सेवा करीत आहे.
सखुबाई अत्यंत दारिद्र्य अवस्थेत आपले जीवन जगत आहे. त्यांना ना स्वत:च्या मालकीचे घर आहे ना घरकुल. शासकीय योजनांपासून त्या वंचित आहेत. श्रावणबाळ योजनेतून त्यांना ६०० रुपये महिना मिळत होता. तोही आता बंद झाला आहे. त्यांची मुलगी अनुसया भोसकर यांनाही काही तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.
‘त्याग’ काय असतो याचा अर्थ अनुसायाच्या रुपाने सर्वसामान्यांसमोर आला. आईची सेवा करायला कोणी नाही म्हणून घर जावयासोबत त्यांनी लग्न केले. घरजावई सोडून गेल्यावर त्या तिथेच आईजवळ राहिल्या. पुन्हा विवाह करण्याचा विचारही त्यांनी मनात आणला नाही.
आईची सेवा हेच आपले कर्तव्य समजून त्या सखुबार्इंची काळजी घेत आहे. सकाळी उठून आईचे अगदी केस विंचरण्यापासून तर रात्री जेऊ घालण्यापर्यंतची कामे त्या करीत आहेत. घरोघरी कपडे धुण्याचे काम करुन त्या आपला उदरनिर्वाह करीत आहे.

Web Title: Mother got mother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.