क्षुल्लक कारणावरुन वाद, रागाच्या भरात दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 12:24 PM2022-01-10T12:24:18+5:302022-01-10T12:44:55+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे एका महिलेने पतीसोबत झालेल्या वादातून रागाच्य भरात स्वतःच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
रवी रणदिवे
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : क्षुल्लक वादातून रागाच्या भरात घरून निघून जात दोन चिमुकल्या मुलांसह मातेने शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी शेतशिवारात रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रागाच्या भरात माणूस काय करेल काही सांगता येत नाही. मालडोंगरी येथेही घरगुती भांडणाचा राग मनात ठेवत एका महिलेने आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलत स्वत:ही उडी मारून जीवन संपविले. दीपाली रवी पारधी (३०), असे मृत महिलेचे नाव असून, पीयूष (६), आयुष (३), तिघेही रा. मालडोंगरी अशी चिमुकल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, दीपाली पारधी हिचे शनिवारी पती रवी पारधी याच्यासोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. याचा राग दीपालीच्या मनात असावा.
शनिवारी दुपारी मुलांसह शेतावर कामाला जाते असे सासूला सांगून दीपाली पीयूष आणि आयुषला घेऊन घरून निघून गेली. मात्र, सायंकाळ होऊनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिचा गावात व शेतशिवारात शोध घेतला. रविवारी ब्रह्मपुरी-मालडोंगरी रस्त्याजवळच्या एका शेतातील विहिरीत दीपाली व तिच्या दोन मुलांच्या चपला पाण्यावर तरंगताना आढळून आल्या.
पोलीस निरीक्षक रोशन यादव, सहायक पोलीस निरीक्षक अनिल कुमरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गेडाम, विजय मैंद, उमेश बोरकर यांनी घटनास्थळ गाठले. विहिरीतून दीपाली व दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह काढण्यात आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली. मृत महिलेच्या पश्चात पती व सासू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बिबट्याचा मृत बछडाही आढळला
दीपाली, पियुष व आयुष यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढत असताना गावकऱ्यांना विहिरीत बिबट्याचा बछडाही मृतावस्थेत आढळून आला. त्यालाही बाहेर काढण्यात आले. याची माहिती ब्रम्हपुरी वनविभागाला देताच वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, मृत बछडा तीन ते चार महिन्याचा असून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. आज सोमवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती ब्रम्हपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्म्णे यांनी लोकमतला दिली.