अखेर १३ तासांनी झाली ‘त्या’ मायलेकाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 05:59 PM2022-02-04T17:59:46+5:302022-02-04T18:09:32+5:30
बिबट्यास पाहण्यासाठी गावातील लोकांनी चांगलीच गर्दी केली. या गर्दीने आणि लोकांच्या गोंगाटामुळे मादी बिबटाने एका पिल्लास कसेबसे सुरक्षितस्थळी हलविले. मात्र दुसरे पिल्लू जागेवच राहिले.
चंद्रपूर : अखेर १३ तासांनी एकमेकांपासून दूर झालेल्या मादी बिबट व तिच्या बछड्याची भेट झाली. यासाठी नागभीड आणि ब्रम्हपुरी येथील वनविभागास प्रयत्नांची चांगलीच शिकस्त करावी लागली.
गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान हे मादी बिबट आपल्या चार ते पाच महिन्यांच्या दोन पिल्लांसह किरमिटी गावाच्या अगदी शेजारी शिवारात स्वछंद विहार करीत असल्याचे गावातील एका व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्याने ही बाब गावात येऊन सांगितली. क्षणात ही बाब कर्णोपकर्णी झाली आणि या बिबट्यास पाहण्यासाठी गावातील लोकांनी चांगलीच गर्दी केली. या गर्दीने आणि लोकांच्या गोंगाटाने या मादी बिबटाने एका पिल्लास कसेबसे सुरक्षितस्थळी हलविले. मात्र दुसरे पिल्लू जागेवच राहिले.
दरम्यान गावातील काही जागरूक नागरिकांनी वनपरिक्षेत्र कार्यालयास ही माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि लोकांचा जमाव दूर करून परिसर निर्मणुष्य केला.आणि ते मादी बिबट त्या पिल्लाजवळ येण्याची वाट पाहू लागले.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ते मादी बिबट त्या पिल्लाजवळ आले आणि स्वतःसोबत घेऊन गेले. तब्बल १३ तास वन विभाग किरमिटी गावाजवळील शिवारात त्या पिलाच्या आणि बिबट मादीच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. या मायलेकाच्या भेटीनंतर वनविभागाने समाधानाचा सुस्कारा सोडला.