शिंदे गटातील आमदाराच्या मातोश्री विकतायंत 'टोपलं, सूप-दुर्डी'; म्हणे गावच्या यात्रेत होते जादा विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 03:10 PM2023-04-07T15:10:13+5:302023-04-07T15:12:03+5:30
चंद्रपूर शहरात सध्या माता महाकालीची यात्रा सुरु आहे. या यात्रेत एक रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आजीबाईंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
चंद्रपूर - राजकारणी, आमदार, खासदार म्हटलं की घरी-दारी सुबत्ता. पैसा-अडका आणि घरी उद्योगधंदे असाच समज सध्याच्या काळात बनलाय. कारण, आजकाल नगरसेवकही कोट्यवधींचे मालक असल्याचे दिसून येतात. त्यामुळे, आमदार म्हणजे श्रीमंतांच्या यादीतच त्यांची गणना केली जाते. त्यातच, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शिवसेना पक्षात झालेल्या बंडाळीमुळे आमदारांवर पैसे घेतल्याचे गंभीर आरोप केले जात आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना ५० खोक्के, एकदम ओक्के म्हणत चिडवले जाते. मात्र, याच शिंदे गटासोबत गेलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री आजही गावच्या यात्रेत बांबूच्या टोपल्या विकताना दिसून आल्या.
चंद्रपूर शहरात सध्या माता महाकालीची यात्रा सुरु आहे. या यात्रेत एक रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आजीबाईंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. कारण, या आजीबाई केवळ सुपल,दुर्डी-टोपलं विकणाऱ्या बाई नसून राज्याच्या विधानसभा सदस्यांच्या म्हणजेच आमदाराच्या मातोश्री आहेत. त्यातही विशेष बाब म्हणजे शिंदे गटासोबत गेलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या त्या आई आहेत. ज्या आमदारांनी ५० कोटी घेतल्याचे आरोप केले जातात, त्या आमदारांची आई रस्त्यावर बसून टोपलं विकताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
गंगुबाई जोरगेवार या चंद्रपूर किंवा तालुक्यातील भागात अम्मा नावाने सर्वांना परिचीत आहेत. मुलगा आमदार असतानाही यात्रेत मोठी मागणी असते म्हणून आजही टोपलं, सुपली-दुर्डी विकताना दिसून येतात. वयाच्या ८० व्या वर्षीही गंगुबाई यंदा देवी महाकाली यात्रेत आपला व्यवसाय करताना दिसून आल्या. त्यांचे सुपुत्र किशोर जोगरेवार हे गत पंचवार्षिक निवडणुकीत २०१९ साली पहिल्यांदा आमदार बनले. विशेष म्हणजे मुलगा आमदार बनल्यानंतरही आपण आपला व्यावसाय सोडणार नसल्याचं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानुसार, गावच्या यात्रेत त्यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.