आईच्या पार्थिवाला मुलींनीच दिला खांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:00 AM2020-10-05T05:00:00+5:302020-10-05T05:00:22+5:30
मृतक सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्य करीत आहे. अनेक पदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आहे. चळवळीत कार्य करीत असल्यामुळे कोणतेही चांगले काम करण्याची सवय लागते आणि त्यातून चांगले काय, वाईट काय समजण्यास वाव मिळतो. हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे महिलांना अंत्यसंस्कार करण्याच्या विधीत सक्रिय स्थान दिले जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील सुमित्राबाई शामराव साळवे (८०) यांचा शनिवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची दोन मुले व एक मुलगी, सून, नातवंड असा परिवार आहे. संपूर्ण आयुष्य आईने मायेची उब दिली. तिचे ऋण फेडणे शक्य नाही. मात्र तिच्या अंतिम प्रवासात तिच्या पार्थिवाला आपणही खांदा द्यावा, अशी इच्छा मुलीच्या मनात आली. आणि तिच्या भावाने रुढी परंपरेला फाटा देत याला संमती दर्शविली. सोबतच आईच्या पार्थिवाला भडाग्नीदेखील मुलीनेच दिला.
मृतक सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्य करीत आहे. अनेक पदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आहे. चळवळीत कार्य करीत असल्यामुळे कोणतेही चांगले काम करण्याची सवय लागते आणि त्यातून चांगले काय, वाईट काय समजण्यास वाव मिळतो. हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे महिलांना अंत्यसंस्कार करण्याच्या विधीत सक्रिय स्थान दिले जात नाही. ते अपवित्र समजले जाते. परंतु सुमित्राबाई यांचा मुलगा संभाजी साळवे हे पुरोगामी विचारांचे वाहक असल्यामुळे त्यांनी आपल्या आईच्या तिरडीला मुलगी मिना कातकडे व कवडुबाई धानोरकर तसेच सुनबाई विना साळवे व सविता साळवे यांना खांदा देण्यास सहमती दर्शवून महिलांनाही अंत्यसंस्कारात स्थान दिले. यावेळी संभाजी साळवे व मारोती साळवे या दोन मुलासह, मुलगी व सुनेनेसुद्धा सुमित्राबाईच्या पार्थिवाला खांदा देऊन चितेला भडाग्नी दिला. त्यामुळे महिलांनाही अंत्यसंस्कार करतेवेळी अंत्यविधी पार पाडण्याची संधी मिळाल्याने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला. जेवढा हक्क आईच्या, वडिलाच्या तिरडीला खांदा देण्याचा मुलाचा आहे, तेवढाच मुलीचासुद्धा आहे, हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.
साळवे परिवाराने २०१९ मध्ये आपल्या वडिलांचा अंतिमसंस्कार सुद्धा याच पद्धतीने केला होता. समाजाने सुद्धा याच पद्धतीने अंतिम संस्कार करून मनात असलेली भीती घालवावी. तसेच मुलगा आणि मुलगी यात भेद न पाळता समाजात आदर्श निर्माण करावा, असे संभाजी साळवे यांनी सांगितले.