पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार पाच हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:14+5:302021-09-03T04:28:14+5:30
केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी जानेवारी २०१७ मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर मोठा ...
केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी जानेवारी २०१७ मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर मोठा विघातक परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच पहिल्यांदाच गर्भवती महिलांची प्रसूती व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना कुटुंबाची दैनावस्था होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मातृ वंदना योजना गरीब व गरजू मातांसाठी वरदान ठरू शकते. मात्र, नोंदणी करण्याची प्रक्रिया काहींना अडचणीची ठरत आहे. केंद्र सरकारने मातृ वंदना सप्ताह राबविण्याचा निर्णय घेण्यासोबतच यापूर्वीच्या किचकट अडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
तीन टप्प्यात मिळणार पैसे
गर्भवती महिला व नवजात बालकांच्या विकासाकडे लक्ष देणे हे या योजनेचा हेतू आहे. योजनेतंर्गत गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात पाच हजार रुपये टाकले जाते. पहिला हप्ता एक हजार रुपए गर्भधारण झाल्यानंतर १५० दिवसांच्या आत, दुसरा हप्ता दोन हजार १८० दिवसांच्या आत तर तिसरा हप्ता बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पहिल्या लसीकरणाआधीच मिळतो.
या महिलांना मिळतो लाभ
ज्या महिला दैनंदिन मजुरीचे काम करतात किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. याचा मुख्य उद्देश गर्भवती असताना मजुरी न करता आल्याने झालेले नुकसान काही प्रमाणात कमी करण हा आहे. या मदतीमुळे गर्भवती महिलांना आराम करण्याचा वेळ मिळतो.
कशी करावी नोंदणी
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना २०२१ अंतर्गत केंद्र सरकारने नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. लाभार्थी स्वत: ऑनलाइन नावनोंदणी करू शकतात. यासाठी सर्वात आधी लाभार्थ्याला ‘डब्ल्यूडब्ल्यू.पीएमएम.सीएएस. एनआयसी.इन’ या साईटवर लॉगिन करून नाव नोंदवावा लागेल. ही प्रकिया ऑनलाइन असल्याने घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करता येते. शिवाय, जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.