माऊंट एव्हरेस्टवीर आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरीसाठी शासनाचे लक्ष वेधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:26 AM2021-02-14T04:26:00+5:302021-02-14T04:26:00+5:30
चंद्रपूर : राज्यात भाजपाची सत्ता असताना जिवती नगरपंचायत क्षेत्रातील अनेक योजनांसाठी, विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध केला. या भागातील आदिवासी ...
चंद्रपूर : राज्यात भाजपाची सत्ता असताना जिवती नगरपंचायत क्षेत्रातील अनेक योजनांसाठी, विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध केला. या भागातील आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर सर करत मिशन शौर्य यशस्वी केले. या विद्यार्थ्यांना पोलीस विभागात नोकरी देण्याचे ठरविले होते. मात्र हे विद्यार्थी अजूनही नोकरीपासून वंचित आहेत. येत्या विधानसभा अधिवेशनात या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधणार आहे, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केले.
जिवती येथे भाजपा महिला आघाडीतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित तेजस्विनी महिला जागर संमेलनात ते बोलत होते. मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अलका आत्राम, माजी महापौर अंजली घोटेकर, विजयालक्ष्मी डोहे, जि.प. सदस्य गोदावरी केंद्रे, कमलाबाई राठोड, तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, तालुका महामंत्री दत्ताजी राठोड, पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. १५ ऑगस्ट २०२२ ला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. आजही महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रात या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नारीशक्तीने एकत्र येत अन्यायाविरुध्द लढा देण्याचे आवाहनही यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केले.